पुणे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. त्यातील एक टप्पा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावणार आहे. मात्र आता हडपसर पर्यंत ही मेट्रो धावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हडपसर येथील कार्यक्रमात  केली.
CM चषक कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हडपसर येथे करण्यात आले. यावेळी मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट,खासदार अनिल शिरोळे, स्थानिक आमदार योगेश टिळेकर तसेच भाजपचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले की, CM चषक या माध्यमातून अनेक मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले असून यातून खेळाडूंना त्यांचा खेळ दाखवण्यास एक व्यासपीठ मिळाले आहे. यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू देशाला मिळणार आहे. याचा फायदा २०२० मध्ये होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धेत निश्चित होईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  सध्याचा तरुण हा मैदानी खेळापेक्षा कॉम्प्युटरवर गेम खेळत असल्याने तणाव, व्यसनाधीन आणि नैराश्य यात अडकल्याचे दिसते ही चिंतेची बाब आहे.  तरूण वर्ग मैदानी खेळाकडे वळला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हडपसर येथे आयोजित करण्यात आलेल्या CM चषक स्पर्धेत  विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रिकेट आणि कॅरम खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी क्रिकेटच्या मैदानावर बॅट हातामध्ये घेतली. तर यावेळी बॉल कोण टाकणार असा प्रश्न पडला. त्यात लगेच आमदार टिळेकर यांनी मुख्यमंत्र्यांना बॉल टाकताच ज्या प्रकारे विरोधकांना मुख्यमंत्री त्यांच्या खास शैलीत सुनावतात त्यातच स्टाईल मध्ये बॉल देखील टोलवला.

आगामी निवडणूक डोळ्यासमोर लक्षात ठेवून CM चषक स्पर्धेच्या उद्घाटना दरम्यान स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांनी मतदारसंघात जोरदार फ्लेक्सबाजी केली. तसेच कार्यक्रमा ठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना देखील नागरिकांची संख्या कमी होती.