News Flash

पूरग्रस्तांचे प्रश्न प्रलंबितच

मित्रमंडळ सभागृहाच्या नजीक नुकतेच महापालिकेचे राजमाता जिजाऊ रुग्णालय सुरू झाले आहे.

|| भक्ती बिसुरे

पुणे : नवी पेठ-पर्वती या महापालिके च्या प्रभाग क्रमांक २९ मध्ये पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्यांचे प्रश्न असले तरी या प्रभागातील मुख्य प्रश्न हा पूरग्रस्त वसाहतींचा आहे. चार वर्षात पूरग्रस्तांचे प्रश्न कायम राहिल्याचे चित्र आहे. पदपथांचा अभावही या प्रभागात जाणवतो. नागरिकांना दैनंदिन भेडसाविणाऱ्या प्रश्नांवर ठोस कार्यवाही गेल्या चार वर्षात नगरसेवकांकडून झालेली नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रभागातील समस्याही जैसे-थे आहेत.

नवी पेठ-पर्वती प्रभागात स्वारगेट बसस्थानकापासून ते गणेश कला क्रीडा के ंद्रापर्यंत आणि ऐतिहासिक पर्वतीपासून सारस बागेपर्यंत अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. सरस्वती शेंडगे,  स्मिता वस्ते, धीरज घाटे हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात.  शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग अशी या प्रभागाची ओळख आहे, मात्र तरीही प्रभागातील समस्या वर्षानुवर्षे आहेत तशाच आहेत. निकृष्ट रस्ते, कमी दाबाने येणारे पाणी या समस्यांना नागरिकांना रोजच्या रोज तोंड द्यावे लागत आहे. या प्रभागात ७० टक्के  भाग झोपडपट्टी आणि वसाहतींचा आहे, तर उर्वरित ३० टक्के  भागात गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामुळे दोन्ही गटातील नागरिकांना समस्या भेडसावत असल्याचे दिसून येते.

प्रभागात कचरा प्रक्रिया प्रकल्प नाही, त्यामुळे एका बाजूला सजावट आणि सुशोभीकरणासाठी पारितोषिके  मिळवणाऱ्या याच प्रभागात कचऱ्याचे ढीगही नजरेस पडतात. मित्रमंडळ सभागृहाच्या नजीक नुकतेच महापालिकेचे राजमाता जिजाऊ रुग्णालय सुरू झाले आहे. प्रसूती केंद्र म्हणून सुरू के लेल्या या रुग्णालयात सुरुवातीला सिझेरियन विभागही होता, मात्र आता तो कार्यरत नाही. त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला सिझेरियनची आवश्यकता असेल तर आयत्यावेळी तिला ससून किं वा इतर ठिकाणी पाठवावे लागते. महापालिके च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या इमारतीचे बांधकाम नव्याने करण्याचा घाट घालण्यात आला, मात्र ते काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. नगरसेवक यामागे करोना साथरोगाच्या काळामुळे काम रखडल्याचे कारण देतात, मात्र त्याआधीच्या तीन वर्षांतही शाळेच्या इमारतीच्या कामात कोणतीही प्रगती दिसू शकली नाही हे वास्तव आहे. सातारा रस्त्यावरील पंचमी उपाहारगृहापासून लक्ष्मीनारायण चित्रपटगृहा दरम्यानच्या वाय आकाराच्या रस्त्यावर अनेक लहान-सहान दुकाने आहेत. हा भाग अत्यंत रहदारीचा असून मोठ्या वाहनांची ये-जा असते. त्यामुळे तिथे अपघात होण्याचा धोका आहे. मात्र, त्याबाबत नगरसेवक काहीही करत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.

त्याच भागात असलेल्या भुयारीमार्गासाठी महापालिके चे कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र आता भुयारीमार्गाची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे नागरिक त्याचा वापर करण्याची शक्यता नाही. त्यामुळे पादचाऱ्यांनी ये-जा कशी करायची हा प्रश्न आहे.

नागरिक म्हणतात

पाणी, रस्ते, वाहतूक कोंडी अशा प्राथमिक समस्या आहेत, मात्र त्याची तक्रार के ली असता दखल घेतली जाईल असे वाटत नाही. काही भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती उद्भवते, मात्र त्यावर कोणतेही नियोजन नगरसेवक करताना दिसत नाहीत. स्वच्छ सर्वेक्षणात या प्रभागाचा प्रथम क्रमांक आला होता, पण कचरा प्रक्रिया के ंद्र नाही, असा विरोधाभास आहे. सुशोभीकरणासारखे काही स्तुत्य उपक्रम आहेत.   – पराग जाधव, नवी पेठ.

प्रभागातील कोणत्या ना कोणत्या भागात नेहमी खोदकामे सुरू असतात, त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती नेहमीच वाईट असते. प्रभागातील काही भाग उंच असल्यामुळे पाणी चढत नाही. त्यामुळे त्रास होतो. भटक्या कु त्र्यांचा प्रचंड त्रास या परिसरात आहे, त्यामुळे संध्याकाळनंतर घरी परतताना भीती वाटते. वाहतूक कोंडी हा तर अनेक वर्षे त्रासाचा विषय आहे, मात्र नगरसेवक नागरिकांच्या समस्यांबाबत फारसे गंभीर नाहीत. – धनश्री बापट, पर्वती.

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

पर्वती, स्वारगेट, गणेश कला क्रीडा रंगमंच, दांडेकर पूल, लोकमान्यनगर, शास्त्री रस्ता, नवी पेठ, टिळक रस्त्याचा काही भाग, बाजीराव रस्त्याचा काही भाग, गरवारे बाल भवन परिसर, श्रमिक पत्रकार संघ, सेनादत्त पोलीस चौकी, राजेंद्रनगर.

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

नगरसेवक निवडणुकीनंतर प्रभागात फिरकलेले नाहीत. माझ्या कार्यकाळात निधी मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या कामाला सुरुवात के ली, मात्र त्यात अद्याप कोणतीही प्रगती नाही. राजमाता जिजाऊ प्रसूतिगृहात सिझेरियन विभागाची सुविधा उभी के ली, मात्र अद्यापही सिझेरियनसाठी महिलांना ससूनला पाठवावे लागत आहे. – अशोक हरणावळ,  शिवसेना

प्रभागात महिला स्वच्छतागृहांची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे. दत्तवाडी, लक्ष्मीनगर या भागात मोठ्या संख्येने पूरग्रस्तांच्या वसाहती आहेत. पूरग्रस्तांना घरे मालकी हक्काने करण्याचा प्रश्नही तसाच प्रलंबित आहे. नगरसेवकांचे प्रभागाकडे लक्ष नाही. संपूर्ण प्रभागाकडे लक्ष देण्याऐवजी ज्या भागात नगरसेवकांचे वास्तव्य आहे, त्याच भागाकडे लक्ष दिले जात आहे. – किरण गायकवाड, काँग्रेस

लोकप्रतिनिधी म्हणतात

बचतगटांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणून त्यांना सक्षम करण्याचे मुख्य ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम के ले. अनेक बचतगट गृहोद्योगाशी संबंधित प्रशिक्षण देतात, मात्र त्यापलीकडे जाऊन काळाची गरज असलेले संगणक, वाहन चालवणे, शिवणकाम अशा बाबींचे प्रशिक्षण दिले. त्यातल्या अनेकींना त्यातून रोजगारही मिळाले आहेत. प्रभागातील रस्ते, गटारे आणि नाल्यांची स्वच्छता अशी कामे नियमित सुरू आहेत. – स्मिता वस्ते , नगरसेविका

नवीन कामे सुरू करून ती अर्धवट ठेवण्यापेक्षा प्रभागातील सर्व महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित राहतील याची खबरदारी घेण्यात आली आहे. माजी नगरसेवक आबा बागुल यांनी उभे के लेले सेव्हन वंडर पार्क , फोरडी चित्रपट गृह अशा काही प्रकल्पांचा यात समावेश आहे. प्रभागाचे सुशोभीकरण करून परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. पर्वती, सणस मैदान अशा परिसराच्या विकासाचे काम मागील वर्षी नियोजित होते, करोना महामारीमुळे ते यंदा करण्याचे नियोजन आहे. – सरस्वती शेंडगे, नगरसेविका’

प्रभागातील महापालिके च्या कर्मचाऱ्यांची काही घरे अत्यंत वाईट अवस्थेत आहेत, त्यांच्या डागडुजी आणि विकासासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. हिराबागेच्या परिसरात कौशल्य विकास केंद्राचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल. महापालिके च्या आरोग्य सेवेत पेटस्कॅ नची सुविधा नाही, त्यामुळे पेटस्कॅ नची सुविधा देणारे रुग्णालय उभे करण्याचे विचाराधीन आहे. पावसाळा आणि आमच्या प्रभागातील पाणी साचणे, पूर येणे या अडचणी पाहता ते टाळण्यासाठीही कामे सुरू आहेत. – धीरज घाटे, नगरसेवक

नगरसेवकांचे दावे

  •  पाणीपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य
  •   राजमाता जिजाऊ रुग्णालयातात अत्याधुनिक सुविधा
  •   ई लर्निंग शाळेसाठी पाठपुरावा
  •  सुशोभीकरण आणि आधुनिकीकरणाला प्राधान्य

तक्रारींचा पाढा

  •  दैनंदिन स्वच्छतेच्या कामांकडे दुर्लक्ष
  •  पदपथांची दुरवस्था
  •  पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम
  •  रस्त्यावर अस्वच्छता
  •  मोकाट श्वानांचा उपद्रव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 1:47 am

Web Title: pune mhanagar palika election water problem sewage corporator akp 94
Next Stories
1 ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांचे निधन
2 महाराष्ट्र साहित्य परिषद: वादळी सभेनंतर अखेर कार्यकारिणीला पाच वर्षे मुदतवाढ
3 टाळेबंदीमुळे वर्षभरात नोंदणी विवाहांत ३० टक्क्यांनी घट
Just Now!
X