कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर येथे सहलीसाठी जाताना बेपत्ता झालेल्या चौघांचा शोध गुरुवारी लागला. गाडीचा अपघात होऊन ती नीरा नदीत कोसळल्यामुळे या चौघांचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. चौघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी दुपारी नीरा नदीच्या पात्रात सापडला होता. उर्वरित तिघांचे मृतदेह गाडीमध्येच होते. गुरुवारी ही गाडी नदीतून बाहेर काढण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून हे चौघे जण बेपत्ता असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांसह पोलीस त्यांचा शोध घेत होते.
पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळजवळील नीरा नदीमध्ये अपघातानंतर गाडी बुडाल्यामुळे या चौघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत असल्याचे पोलीसांनी सांगितले. बुधवारी या चौघांपैकी चिंतन बूच याचा मृतदेह पोलीसांना नीरा नदीमध्ये मिळाला होता. गाडी नदीत बुडाल्यानंतर चिंतन याने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेर पडल्यानंतर तो स्वतःला वाचवू शकला नाही. नदीमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. गाडीतील उर्वरित तिघेजण बाहेर पडू न शकल्याने त्यांचा गाडीतच मृत्यू झाल्याचे समजते. प्रणव लेले, साहिल कुरेशी आणि श्रुतिका चंदवाणी अशी उर्वरित तिघांची नावे आहे. या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत या चौघांचा शोध घेण्यात आला.
प्रणव लेले, चिंतन बूच, साहिल कुरेशी आणि श्रुतिका चंदवाणी हे एका जाहिरात कंपनीमध्ये कामाला होते. या कंपनीमध्ये प्रणव हा भागीदार होता. शुक्रवारी रात्री उशीरा कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर येथे सहलीला जात असल्याचे सांगून चौघे जण बाहेर पडले. श्रुतिका ही मूळची कोल्हापूर येथील आहे. त्यामुळे तिला कोल्हापूर येथे सोडून हे तिघे पुढील प्रवासाला जाणार होते. खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावरून त्यांची गाडी पुढे गेल्याचे सीसीटीव्हीतील चित्रीकरणावरून स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. शनिवारपासून या चौघांचेही मोबाइल संच स्वीच ऑफ झाले होते.