भाजप माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांच्या विवाह सोहळ्याला माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार नितेश राणे, प्रशांत परिचारक यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावली होती. या लग्नसमारंभादरम्यान नेतेमंडळींनीच राज्यातील करोनाविषयक नियमांना केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळालं.

भाजप माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांचा विवाहसोहळ रविवारी पडला. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि अन्य नेतेमंडळही उपस्थित होती. यावेळी या लग्न समारंभाला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असल्याचंही दिसून आलं.

सध्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभांसाठी जास्तीत जास्त २०० लोकांची उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. परंतु यावेळी उपस्थितांची संख्याही अधिक होती. तसंच लग्नसमारंभात असलेल्या बैठक व्यवस्थेमध्येही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करण्यात आलं नसल्याचंही दिसून आलं. त्यामुळे नेते मंडळींनीच करोनाविषयक नियमांना केराची टोपली दाखवल्याचं म्हटलं जात आहे.