उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूतोवाच

पुणे :  देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुणे-मुंबई ‘हायपरलूप’प्रकल्पाला नव्याने सरकारमध्ये आलेल्या महाविकास आघाडीकडून खोडा लागण्याची चिन्हे आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सूतोवाच केले. ‘हायपरलूपचा प्रयोग जगात कुठेही झालेला नाही. हा प्रकल्प जगभरात कुठेही यशस्वी झाल्यास पुण्यात तो राबवायचा किंवा नाही हे ठरवू,’ अशा शब्दांत पवार यांनी हा प्रकल्प राबवण्यास सरकार उत्सुक नसल्याचे संकेत दिले. हा प्रकल्प यशस्वी होतो किंवा नाही, हे प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याची आपली आर्थिक क्षमता नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

वाहतूक क्षेत्रात क्रांती समजला जाणारा आणि जगातील प्रवासी वाहतूक प्रकल्प म्हणून पाहिला जाणारा पुणे-मुंबई ‘हायपरलूप’ प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतला आहे. तब्बल ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक या प्रकल्पात येणार होती. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प असून अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई या दरम्यानचा प्रवास केवळ २३ मिनिटांत शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च करून ११.८० किलोमीटर लांबीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यास तत्कालीन राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पासाठी आग्रही होते. त्यानुसार पीएमआरडीएकडून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला ‘पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून आणि डीपी वर्ल्ड एफझेडई, हायपरलूप टेक्नॉलॉजीज आयएनसी यांच्या भागीदारी समूहाला मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यासही फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे. याशिवाय या प्रकल्पासाठी नीती आयोगाने देखील पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, हा प्रकल्प सुरू करण्याची आपली क्षमता नाही. आगामी काळात हा प्रकल्प जगभरात कुठेही यशस्वी झाल्यास, त्याचा विचार करताना पुणे-मुंबईची गरज लक्षात घेतली जाईल. पुणे-मुंबई दरम्यान द्रुतगती महामार्गावर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बोगदा करण्याचे काम सुरू आहे. तो बोगदा पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक आणखी सुरळीत होईल.