पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसला ‘पूल अ‍ॅण्ड पूश’ (दोन्ही बाजूने इंजिन) तंत्रज्ञान लावून दोन महिने पूर्ण होत आहेत. या तंत्रज्ञानामुळे गाडीचा वेग वाढला असला, तरी प्रवाशांना त्याचा फायदा होत नसल्याचे वास्तव आहे. वेग वाढला असताना गाडी सोडण्याची वेळही वाढविण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा कायम राहिला आहे. त्यामुळे ही गाडी वेळेत सोडून ती पूर्वीच्या वेळेआधी पुणे किंवा मुंबईला पोहोचवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रेल्वे गाडय़ांना पुढील बाजूच्या इंजिनबरोबरच मागील बाजूनेही इंजिन जोडून तिचा वेग वाढविण्याचे ‘पूल अ‍ॅण्ड पूश’ तंत्रज्ञान मध्य रेल्वेकडून सध्या विविध गाडय़ांसाठी वापरणे सुरू केले आहे. त्यासाठी रेल्वे गाडय़ांना ‘एसएचबी’ प्रकारातील डबे जोडावे लागतात. त्यामुळे दोन्ही बाजूने इंजिन सुरू असताना दोन्ही इंजिनचा समन्वय राहून प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येतो. पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसला दोन महिन्यांपूर्वी ‘एसएचबी’ प्रकारातील डबे जोडून तिच्यासाठी पूल अ‍ॅण्ड पूश तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

पूल अ‍ॅण्ड पूश तंत्रज्ञानामुळे इंटरसिटी एक्स्प्रेसचा प्रवास ३५ ते ४० मिनिटांनी कमी होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार गाडीच्या प्रवासाचा वेळ कमी झाला असला, तरी प्रत्यक्षात त्याचा प्रवाशांना फायदा होत नाही. पुणे स्थानकातून या गाडीच्या सुटण्याचा वेळ पूर्वी संध्याकाळी ५.५० होता. मात्र, पूल अ‍ॅण्ड पूश तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात झाल्यापासून ही गाडी पुणे स्थानकावरून संध्याकाळी ६.२५ वाजता सोडण्यात येते. मुंबईतूनही ही गाडी उशिराने सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गाडीचा वेग वाढून प्रवासातील वेळ कमी झाला असला, तरी गाडी उशिराने सोडण्यात येत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होतो. गाडी सुटण्याची वाट पाहत प्रवासी फलाटावर बसून असतात. त्यामुळे ही गाडी दोन्हा बाजूने वेळेत सोडून वेळेपूर्वी पोचवावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

इंटरसिटी एक्स्प्रेसला पूल अ‍ॅण्ड पूश तंत्रज्ञानावर चालवून गाडीचा वेग वाढूनही प्रवाशांना त्याचा फायदा होत नाही. ही गाडी पुणे आणि मुंबईतूनही वेळेवर सोडली जात नाही. त्यामुळे प्रवाशांना फलाटावर थांबून रहावे लागते. गाडय़ांच्या प्रवासाचा वेळ कमी होऊन रेल्वे कर्मचाऱ्यांना लाभ होतो. प्रवाशांचा खोळंबा मात्र कमी झालेला नाही.

– हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा