पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील खंडाळा ते मंकी हिलदरम्यान मालगाडीचे डब्बे घसरल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या ठिकाणी रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून, परिणामी पुन्हा एकदा या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.  या मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन आणि भुसावळ एक्सप्रेस या गाड्या आज रद्द करण्यात आल्या असून, पुणे-कर्जत आणि कर्जत-पुणे ही रेल्वे देखील रद्द करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही पूर्व कल्पना न देता रेल्वे रुळाचे काम हाती घेतल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. रेल्वेरुळाच्या या कामामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.