06 March 2021

News Flash

पुणे-मुंबई रेल्वे प्रवासात पासधारकांची दादागिरी

डेक्कन क्वीनचा १ जूनला वाढदिवस साजरा करण्यात आला.

डेक्कन क्वीनच्या महिला डब्यात सातत्याने भांडणे; कठोर उपाययोजना करण्याची प्रवाशांकडून मागणी

पुणे-मुंबई रेल्वे प्रवासात प्रामुख्याने डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या महिलांच्या डब्यामध्ये काही पासधारकांकडून इतर प्रवाशांवर दादागिरी केली जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पासधारकांशिवाय इतर महिला प्रवासी डब्यामध्ये शिरल्यास अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळण्याबरोबरच काही वेळेला मारही खावा लागत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. या ‘पासधारक दादागिरी’मुळे इतर महिला प्रवासी त्रासल्या असून, या प्रकाराबाबत तातडीने  उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावणाऱ्या व दररोज कामानिमित्त मुंबईत जाणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या डेक्कन क्वीनमध्ये १९९५ मध्ये महिलांसाठी १०८ आसनांचा स्वतंत्र डबा ठेवण्यात आला आहे. या डब्यामध्ये २४ आसने आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. १२ आसने कर्जतपर्यंत, तर १२ आसने लोणावळ्यापर्यंतच्या प्रवासासाठी ठेवण्यात आली आहेत. इतर आसने संपूर्ण प्रवासासाठी उपलब्ध आहेत. त्यात पासधारक महिलांकडून प्रवास केला जातो. मात्र त्यातील काही मंडळींकडून पासधारकाशिवाय डब्यामध्ये शिरणाऱ्या महिलांना दमदाटी करून बाहेर काढले जाते. प्रसंगी मारहाणही केली जाते. हे प्रकार सातत्याने सुरू असतानाही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

महिलांच्या डब्यामध्ये आरक्षणासाठी असलेल्या आसनांचे आरक्षण झाले नसल्यास ही आसने पासधारकांकडून बळकावली जातात. त्याचप्रमाणे पासधारकांच्या जागा शिल्लक असली, तरी तिथे कुणाला बसू दिले जात नाही. रिकाम्या असलेल्या जागेवर बसण्याचा एखाद्या महिलेने प्रयत्न केल्यास काही महिला थेट वादावादीवर येतात. संबंधिताला ढककून बाहेर काढले जाते. त्याचे साहित्यही डब्याच्या बाहेर फेकले जाते. अनेकदा मोबाइलही हिसकावून तो फेकून दिला जातो. नवीन पासधारक महिलांनाही या चक्रातून जावे लागते. तीन आसनांच्या जागेवर कधीकधी अगदी झोपून प्रवास केला जातो. तिकीट तपासणीसही या डब्यात जाण्यास घाबरतात, असा अनुभवही याबाबतीत सांगण्यात आला.

डेक्कन क्वीनचा १ जूनला वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या दिवशी अनारक्षित डब्यांमध्ये प्रचंड गर्दी झाल्याने तिकीट तपासणिसांनी काही महिलांना पासधारकांच्या डब्यात शिल्लक असलेल्या जागांवर बसण्याची परवानगी दिली. महिला त्या डब्यात गेल्यानंतर काहींनी वादावादी सुरू केली. डब्यात शिरलेल्या एका महिलेला मारहाणही करण्यात आली. नुकत्याच घडलेल्या या घटनेमुळे डेक्कन क्वीनमधील ‘पासधारक दादागिरी’ पुन्हा एकदा स्पष्ट झाली. दुसऱ्या दिवशी रेल्वे प्रशासनाने संबंधित डब्यामध्ये पोलीस संरक्षण दिले. मात्र, हे प्रसंग सातत्याने घडत असल्याने त्यावर ठोस उपापयोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

‘‘डेक्कन क्वीनच्या महिलांच्या डब्यामध्ये महिला पासधारकांकडून इतर महिला प्रवाशांना जागेवरून मारहाण करण्याचे प्रसंग घडतात. काहींमुळे पासधारक संपूर्ण महिलांवर आरोप येतो आहे. या प्रकारांमुळे प्रतिष्ठित असलेल्या या ऐतिहासिक गाडीचा प्रवास बदनाम होतो आहे. पासधारक महिलांना जागेवरून उठवून कुणी तिथे बसत नाही. पण, जागा उपलब्ध असेल, तर ती इतर प्रवाशांना दिली पाहिजे. डेक्कन क्वीन या गाडीतील सर्वसाधारण डबे काढून संपूर्ण गाडी आरक्षित तिकिटांसाठी करावी व ती सकाळी सहा वाजता पुण्यातून सोडावी. त्यामुळे नोकरदार, व्यापारी व इतर प्रवासी अशा सर्वाचाच फायदा होऊन सर्व समस्या दूर होऊ शकतील.’’

– हर्षां शहा, अध्यक्षा रेल्वे प्रवासी ग्रुप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 3:48 am

Web Title: pune mumbai railway pass holders travel bullying
Next Stories
1 महापालिकेकडून हरित न्यायाधिकरणाला दिशाभूल करणारी माहिती
2 ‘लतादीदी-आशाताईंचे गाणे संगीतबद्ध करायचे आहे’
3 येवलेवाडीचा आराखडा तीन महिन्यात तयार करा
Just Now!
X