पालिकेच्या सफाई कामगारांकडून रोजच्या ‘डय़ुटी’सोबत मंडपांमध्येही साफसफाई

सण किंवा उत्सव म्हटले की प्रत्येक घरात सुरू होते ती स्वच्छता मोहीम. गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बहुतांश घरात स्वच्छता होते. परिसरातही स्वच्छता होते. घरातील टाकाऊ वस्तू बाहेर काढल्या जातात. त्यातून दैनंदिन कचऱ्यामध्ये दुपटीने वाढ होते. अशा परिस्थितीत दैनंदिन कचरा उचलण्याचे नियोजन करण्याबरोबरच उत्सवातील दहा दिवसांच्या कालावधीत महत्त्वाचे चौक, मंडळांचे परिसर आणि प्रमुख रस्ते लख्ख ठेवण्याची जबाबदारी येऊन पडते ती सफाई कर्मचाऱ्यांवर!

बिनबोभाट आणि कोणताही वाढीव मोबदला वा भत्ता तसेच मुशाहिरा न घेता मध्यरात्री एक ते पहाटे चार या अवघ्या तीन तासात हे सफाई कर्मचारी शहर चकाचक करतात. त्यासाठी वेळप्रसंगी रात्री परिसरातील आरोग्य कोठीतच त्यांना मुक्काम करावा लागतो. उत्सवाच्या काळात अहोरात्र शहर स्वच्छतेचे काम सुरू असल्यामुळे गणेशोत्सवाचा आनंदही त्यांना घेता येत नाही. पण त्याची खंत न बाळगता स्वच्छतेचे काम करणाऱ्या या स्वच्छता दूतांकडून खऱ्या अर्थाने ‘उत्सवाची सेवा’च होत असते.

गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीमुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. एरवी कचरा उचलण्याची ठिकाणे, त्यांच्या जागा आणि रस्ते निश्चित असतात. उत्सवाच्या काळात मात्र त्यामध्ये बदल होतो. या बदललेल्या जागांचा, ठिकाणांचा विचार करून कचरा उचलण्याचे अगदी अचूक नियोजन महापालिकेकडून केले जाते. त्याचे सारे श्रेय सफाई कर्मचाऱ्यांना जाते. एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याची काळजीच त्यांच्याकडून घेतली जाते. उत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर हळूहळू गर्दी वाढत जाते. रात्री बारा-एक वाजेपर्यंत मंडळांचे देखावे सुरु असतात. त्यामुळे रात्री झालेला कचरा रात्रीच उचलण्याचे नियोजन करण्यात येते. बहुतांश मोठय़ा मंडळांतील गणेशाची आरती पहाटेच होते. त्यामुळे त्यापूर्वीच प्राधान्याने मंडळाच्या परिसराची स्वच्छता करावी लागते. सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ सकाळी सहा अशी असते. पण उत्सवाच्या काळात ते पहाटे चारपासूनच कामावर असतात. रात्री एक ते पहाटे चार या तीन तासात रस्त्यांची स्वच्छता त्यांच्याकडून तत्परतेने केली जाते.

उत्सवाच्या काळात या कर्मचाऱ्यांना मुख्य प्रश्न भेडसावतो तो कचरा वाहतुकीचा. रात्री देखावे पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे कचऱ्याची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे रात्री दीड नंतर उचललेला किंवा गोळा केलेला कचरा एका जागेवर जमा करून कंटेनरच्या माध्यमातून तो अगदी पहाटे हलविण्यात येतो. दहा दिवस या कर्मचाऱ्यांचा हाच दिनक्रम असतो. विसर्जन मिरवणूक कधी संपेल, किती तास चालेल, याचा अंदाज कोणालाच बांधता येत नाही. अस्ताव्यस्त पडलेल्या चपला, खाद्यपदार्थाच्या पिशव्या, प्लास्टिक असा विविध प्रकारचा कचरा विसर्जन मार्गावर पडलेला असतो. हा कचरा अवघ्या दीड ते दोन तासांत उचलून कर्मचाऱ्यांकडून रस्ते स्वच्छ केले जातात. घरचा उत्सव सोडून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे सफाई कर्मचारी उत्सवात लोकांचा आनंद द्विगुणीत करत असतात.

गणेशोत्सवातील सफाई कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेचे काम कौतुकास्पद असते. या कामाच्या मागे योग्य प्रकारचे नियोजन असून रात्रीतच शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांकडून यशस्वीपणे पार पाडली जाते. त्यामुळे उत्सवातील स्वच्छतेचे सर्व श्रेय हे त्यांचेच आहे.

सुनील केसरी, उपायुक्त, पुणे पालिका