पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज (सोमवार) चालू आर्थिक वर्षाचे ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा या अंदाजपत्रकामध्ये २०० कोटींची घट करण्यात आली आहे. गतवर्षी महापालिका आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने ५ हजार ६०० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात ३९८ कोटींनी वाढ करून स्थायी समितीने ५ हजार ९९८ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकाला नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकराचा फटका बसल्याचे दिसत आहे.

अंदाजपत्रकात प्रशासनाकडून नवनवीन योजना राबविण्यावर अधिक भर दिला जातो. मात्र यंदा पुणे महापालिका आयुक्तांकडून तसे काही होताना दिसले नाही. त्यामुळे यंदाच्या चालू आर्थिक वर्षाचे ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. त्यामुळे आता स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यामध्ये वाढ करणार की आणखी कात्री लावणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

वर्ष २०१७ आणि २०१८ या कालावधीत नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराचा महापालिकेच्या उत्पनावर परिणाम झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षाचे आयुक्तांचे अंदाजपत्रक ५ हजार ३९७ कोटींचे करण्यात आले. यंदा वस्तू आणि सेवा करातून १८८१ कोटी मिळतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पाणी योजनेसाठी ११०० कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. शहरात खासगी सहभागातून घनकचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत. ५० टक्के अंदाजपत्रक सेवकवर्ग आणि देखभाल दुरुस्तीसाठी २ हजार ७०५ कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नागरिकांपर्यंत या योजना पोहोचवल्या जाणार असून रस्त्यावरील मुलांसाठी मोबाईल स्कूल मोहीम राबविण्यात येणार आहे. यातून अधिकधिक मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.