X

पुणे पालिकेची हद्दवाढ!

महापालिकेच्या हद्दीमध्ये ३४ गावे घेण्याचे प्रस्तावित आहे.

११ गावांच्या समावेशामुळे पालिकेच्या क्षेत्रात ८१ चौ. किलोमीटरने वाढ

महापालिका हद्दीमध्ये नव्याने अकरा गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे महापालिकेची हद्दवाढ होणार आहे. तब्बल ८१ चौरस किलोमीटरने शहराचे क्षेत्र विस्तारणार असून ते ३३१ चौरस किलोमीटर होणार आहे. या गावांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची कामे करावी लागणार आहेत.

महापालिका हद्दीमध्ये अकरा गावांचा समावेश करण्यासंदर्भातील तीन वर्षे रखडलेली अधिसूचना राज्य शासनाने अखेर गुरूवारी काढली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील अकरा गावांच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. समाविष्ट होणाऱ्या गावांपैकी उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पूर्णत: समाविष्ट होणार असून लोहगांव (उर्वरित), शिवणे (उत्तमनगर), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (साडेसतरानळी), शिवणे, आंबेगांव (खुर्द), आंबेगाव (बुद्रुक), उंड्री आणि धायरी ही नऊ गावे महापालिका हद्दीत अंशत: समाविष्ट होणार आहेत.

महापालिकेच्या हद्दीमध्ये ३४ गावे घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ही गावे घेण्यात येणार आहेत. गावे पालिका हद्दीमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याबाबतचा आढावाही घेतला होता. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, जलशुद्धीकरण प्रकल्प, आरोग्य सुविधा, रस्ते या आणि अशा काही अन्य महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठीचा प्राथमिक आराखडाही तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केला होता. आज ना उद्या ही गावे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट होणार हे लक्षात घेऊन या भागात मोठय़ा प्रमाणावर बांधकामेही झाली होती. एका बाजूला बांधकामे होत असताना कचरा, पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाणी वाहिन्यांकडे मात्र दुर्लक्ष झाले. त्यामुळे या गावात असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. आता ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यामुळे या समस्यांची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी महापालिकेला किमान दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. एकूणच चौतीस गावांचा विचार केला तर ही रक्कम तब्बल साडेसात ते आठ हजार कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे हा निधी कसा उभारायचा असा प्रश्नही महापालिका प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये काही वर्षांपूर्वी गावांच्या विकासासाठी लेखाशीर्ष उघडण्यात आले होते. त्यामध्ये थोडी तरतूदही करण्यात आली होती. मात्र सध्याच्या अंदाजपत्रकामध्ये त्यासंदर्भात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे आर्थिक आराखडा करून निधी उपलब्ध करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.

पाच पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द

महापालिका हद्दीत गावे समाविष्ट झाल्यामुळे हवेली पंचायत समितीमधील लोहगांव, केशवनगर, शिवणे आणि फुरसुंगी तसेच उरूळी देवाची पंचायत समिती सदस्यांची पदे रद्द झाली आहेत. सहा महिन्यांपूर्वी या गावांमध्ये निवडणूक झाली होती. दरम्यान, फुरसुंगी गावातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र फुरसुंगी गावाचा पूर्णपणे समावेश झाल्यामुळे या गावातील प्रस्तावित निवडणूक रद्द करण्यात आली आहे. तर या गावात आता २०२२ मध्ये निवडणुका होणार आहेत.

कचरा दोनशे मेट्रिक टनाने वाढणार

शहरात प्रतीदिन पंधराशे ते सोळाशे मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होत असतानाच अकरा गावांच्या समावेशामुळे कचऱ्यामध्येही वाढ होणार आहे. या अकरा गावांमधून किमान दोनशे मेट्रिक टन कचरा निर्माण होण्याची शक्यता असून या गावातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्नही भेडसाविणार आहे. उरूळी देवाची, फुरसुंगी, धायरी, आंबेगाव या भागात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली असून त्याबाबत महापालिकेला तत्काळ निर्णय घ्यावा लागणार आहे.

Outbrain