सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महापालिकेत कसे काम करतात, त्यांच्याकडून कोणत्या विषयांना प्राधान्य दिले जाते, याची पाहणी करण्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले ‘हेडमास्तरां’च्या भूमिकेत गेले आहेत. त्यामुळे मुख्य सभेपूर्वीच्या ‘अजेंडा’ बैठकीबरोबरच ते सभागृहातील कामकाजावरही लक्ष ठेवत आहेत. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये आक्रमकता येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटीतील सायकल चोरीला गेल्याची घटना पुढे आली आहे.
महापालिकेमध्ये एकहाती सत्ता मिळालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला दहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. स्पष्ट बहुमत मिळवीत इतिहास घडविणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून पुणेकरांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. पारदर्शी कारभाराबरोबरच नागरिकांच्या हिताचे निर्णय होतील, अशी अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत. मात्र दहा महिन्यांच्या भाजपच्या कारभारावर नजर टाकल्यास गोंधळ, वादविवाद, विरोधकांकडून सातत्याने होत असलेले आरोप असेच चित्र पुढे आले आहेत. त्यातच महापालिकेच्या मुख्य सभेचा कारभार तर प्रचंड गोंधळात होत असल्याचे दिसून येत आहे. ठरावीक नगरसेवक सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत असल्याच्या तक्रारीही सातत्याने येत होत्या. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण अहवालासंदर्भातील खास सभेच्या निमित्ताने शहराध्यक्ष योगेश गोगावले अचानक महापालिकेत दाखल झाले आणि काही तास थांबून त्यांनी नगरसेवकांच्या कामकाजाची पाहणी केली. गोगावले यांच्या अचानक भेटीमुळे महापालिकेत तर्कवितर्क सुरू झाले. स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत येत्या काही दिवसांत संपणार आहे. त्यामुळे ही भेट त्यासाठीच होती, अशी चर्चाही रंगली होती. प्रत्यक्षात मात्र सभागृहात पक्षाचे नगरसेवक कसे भाषण करतात, कोणत्या विषयांना त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते, त्याची मांडणी त्यांच्याकडून कशी केली जाते, नागरिकांच्या दृष्टीने कोणते प्रश्न उपस्थित केले जातात, प्रशासनाकडून काम करून घेण्याची नगरसेवकांची पद्धत कशी आहे, या बाबतची पाहणी करण्यासाठी ही भेट असल्याचे नंतर सांगण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजात शहराध्यक्ष योगेश गोगावले यापुढेही बारकाईने लक्ष देणार असल्याचे संकेत मिळाले. वास्तविक मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेवरील विषयांसंदर्भात गोगावले महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेता श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक घेतात. त्यात शहराच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चाही करण्यात येते. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर गोगावले यांचे तसेही नियंत्रण होतेच, मात्र त्यांच्या या भेटीमुळे अनेक नगरसेवकांनी पर्यावरण अहवालातील चर्चेत हिरिरीने सहभाग नोंदविल्याला. अवघ्या काही जणांपुरती मर्यादित असलेली चर्चेची व्याप्तीही वाढली. अनेकांनी भाषणासाठी नावांची यादी महापौरांकडे दिली. सभागृहात कोण कसे बोलतो हे पाहिल्यानंतरच त्याला स्थायी समितीच्या सदस्यपदी संधी दिली जाईल, हे पाहण्यासाठीची ही भेट होती, अशी खोचक टीकाटिप्पणी विरोधकांकडून सुरू झाली. मात्र त्यांच्या येण्याची पूर्वकल्पना असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकारात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना यापुढे कामकाजात सहभाग नोंदवावा लागणार असल्याचे स्पष्ट संकेत शहर भाजपकडून देण्यात आले. येत्या काही दिवसांत नगरसेवकांचा सहभाग वाढल्यास किंवा ते आक्रमक झाल्याचे दिसून आल्यास त्यात नवल वाटणार नाही.
महापालिकेतील राजकीय पातळीवर ही घडामोड होत असताना स्मार्ट सिटीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सुरू करण्यात आलेल्या सायकल योजनेतील काही सायकल चोरीस गेल्याचा प्रकार पुढे आला. विद्यापीठ परिसर आणि औंध परिसरात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट सिटीकडून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला वाढता प्रतिसाद मिळाल्यामुळे ओफो या कंपनीकडून काही सायकल स्मार्ट सिटीला उपलब्ध करून देण्यात आल्या. सायकलींची संख्या वाढल्यामुळे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्याचा अधिकाधिक फायदा घेण्यापेक्षा विद्यापीठातील काही सेवकांनी आणि कर्मचाऱ्यांनी या सायकली स्वत:कडेच ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. सायकल योजना हा पुणेकरांसाठी जिव्हाळय़ाचा विषय आहे. महापालिकेकडूनही याच धर्तीवर भाडेतत्त्वावरील सायकल योजना प्रस्तावित आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही योजना शहरात राबविली जाणार हे निश्चित आहे. पण सायकल स्वत:कडे ठेवण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे या योजनेचे भवितव्य काय राहणार, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होत आहे. सायकलींचा गैरवापर होऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, जीपीएससारख्या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतरही हा प्रकार होत असेल तर स्मार्ट सिटी प्रशासनाबरोबरच महापालिकेलाही त्याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. स्मार्ट सिटीकडूनही शहराच्या अन्य भागात ही सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू झाले आहे, तर महापालिकेची सायकल योजना प्रगतिपथावर आहे. संपूर्ण शहरात सायकल धावण्याचे नियोजन करण्यात येत असेल तर या प्रकाराला आळा घालण्यासाठीचा विचारही आत्तापासून करावा लागणार आहे. नाही तर सायकल योजना सुरू पण सायकल नाहीत, अशी परिस्थिती पाहण्याची वेळ पुणेकरांवर येईल. या पाश्र्वभूमीवर या दोन्ही प्रशासकीय यंत्रणांना गांभीर्याने विचार करावा लागेल, यात शंका नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 4:12 am