पुणे : पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण झालेली असताना आणि खड्डय़ांमुळे वाहनचालक त्रस्त झालेले असताना शहरात अवघे साडेतीन हजार खड्डे असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात महापालिकेकडेच खड्डय़ांबाबत साडेपाच हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. खड्डय़ांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षात घेता महापालिकेचा दावा फोल ठरला असून वाहनचालकांना येत असलेला विपरीत अनुभव पाहता शहरात सर्वत्र फार मोठय़ा संख्येने खड्डे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यातच २ हजार ६११ खड्डे बुजविल्याची माहिती पथ विभागाकडून देण्यात आली आहे.

शहरात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची मनमानी पद्धतीने झालेली रस्ते खोदाई, रस्ते दुरुस्तीची तात्पुरती मलमपट्टी यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले. त्याबाबत नागरिकांकडून तक्रारीही करण्यात आल्या. शहरातील प्रमुख मोठे रस्ते, सेवा रस्ते, अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे असतानाही महापालिकेला मात्र हे खड्डे दिसत नसल्याची वस्तुस्थिती महापालिकेने दिलेल्या माहितीमुळे पुढे आली आहे. महापालिकेच्या ऑगस्ट महिन्यातील मुख्य सभेत खड्डय़ांसंदर्भात काँग्रेस नगरसेवक रफिक शेख यांनी पथ विभागाकडे विचारणा केली होती. त्यामध्ये दोन महिन्यात साडेतीन हजार खड्डे पडल्याची आणि साडेपाच हजाराहून अधिक तक्रारी दाखल झाल्याची माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. त्यामुळे शहर खड्डय़ात गेल्याच्या आरोपांनाही पुष्टी मिळत आहे.

खड्डय़ांसंदर्भात तक्रारी करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक, संकेतस्थळ, व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार दोन महिन्यातच ५ हजार ७८५ तक्रारी या माध्यमातून दाखल झाल्या आहेत. साडेतीन हजार खड्डय़ांपैकी २ हजार ६११ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. वास्तविक शहरातील रस्त्यांवर किती खड्डे आहेत, याचा अनुभव वाहनचालक दररोज घेत आहेत. लहान-मोठे खड्डे, खड्डय़ात साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांचे अपघातही होत आहेत. पावसाळ्यापूर्वी केलेल्या तात्पुरत्या मलमपट्टीमुळे पावसाच्या कालावधीत खड्डय़ांची खोली आणि त्यांचा आकारही वाढला आहे. मात्र त्यानंतरही रस्ते सुस्थितीत असल्याचा महापालिकेचा दावा आश्चर्यकारक ठरला आहे.

पावसाळ्यापूर्वी विविध प्रकारच्या सेवा वाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेकडून शासकीय यंत्रणा, खासगी कंपन्या आणि ठेकेदारांना रस्ते खोदाई करण्यास परवानगी देण्यात येते. रस्ते विकसित करताना रस्ते खराब होणार नाहीत, याची जबाबादारी ठेकेदारावर असते. या कालावधीत (डिफेक्ट लायबिलीटी पिरिअड)रस्त्यांची दुरवस्था  झाल्यास ठेकेदाराकडून दंड वसूल करण्यात येतो. मात्र खड्डे पडलेले रस्ते डिफेक्ट लायबिलिटी पिरिअडमध्ये नव्हेत, असा दावाही पथ विभागाने केला आहे. त्यामुळे या रस्ते दुरुस्तीचा खर्चही महापालिका पुणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशातूनच करणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

खड्डे दुरुस्तीचा खर्चही कोटींमध्ये

पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येते. यंदा त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले. गेल्या दहा वर्षांत पालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यानुसार खड्डे दुरुस्ती, रस्ते पूर्ववत करणे, पदपथांची दुरुस्ती या कामांच्या त्यामध्ये अंतभार्व आहे. दहा वर्षांत झालेल्या खर्च लक्षात घेता प्रतिवर्षी दोन कोटी रुपये पालिका केवळ पावसाळ्यानंतरच्या रस्ते दुरुस्तीसाठी करत आहे. पावसाळ्यापूर्वी झालेल्या दुरुस्तीचा खर्च व नंतरचा खर्च पाहता रस्त्यांवरील खर्च पाण्यातच जात असल्याचे दिसून येत आहे.