विद्यमान नगरसेवक आमने-सामने येण्याची शक्यता, इच्छुकांच्या खर्चातही भरमसाट वाढ होणार 

महापालिकेची निवडणूक चारसदस्यीय प्रभागपद्धतीनुसार होणार असल्याच्या घोषणेनंतर पिंपरीतील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने होण्याचा निर्णय अधिकृतरीत्या होणे बाकी असतानाच संभाव्य प्रभाग कसे असतील, आरक्षण कसे पडेल, आपल्या समोर लढण्यासाठी कोण असेल, अशा विविध प्रश्नांनी ‘हवशे, नवशे आणि गवशे’ वर्गवारीतील इच्छुकांना भंडावून सोडले आहे. चारच्या प्रभागरचनेत विद्यमान नगरसेवक अनेक ठिकाणी ‘आमने-सामने’ येतील, असे स्पष्ट संकेत आहेत. मतदारांना भुरळ पाडण्यासाठी ‘विविध व्यवस्थे’वर होणारा इच्छुक मंडळींचा खर्च या निवडणुकीत तुलनेने खूपच वाढणार आहे.

िपपरी पालिकेच्या २००२ मध्ये झालेल्या निवडणुकांसाठी तीन सदस्यांचा एक प्रभाग होता. २००७ मध्ये एकसदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली तर २०१२ मध्ये दोन सदस्यांचा मिळून एक प्रभाग करण्यात आला होता. आगामी २०१७च्या महापालिका निवडणुका कोणत्या पद्धतीनुसार होतील, याविषयी राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. नव्या रचनेविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क मांडले जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार सदस्यांच्या प्रभागपद्धतीनुसार निवडणुका होणार असल्याचे सूतोवाच केले. प्रत्यक्षात घोषणा होईपर्यंत काही खरे नसले तरी आतापासून आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थाही ताब्यात घ्यायच्या आहेत. मोठे प्रभाग असल्यास भाजपलाच त्याचा फायदा होईल, असे गणित स्थानिक नेत्यांकडून मांडण्यात आले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी चारच्या प्रभागाला अनुकूलता दर्शवल्याचे सांगण्यात येते. वरकरणी भाजपला सोपे वाटत असले तरी उमेदवारांची वानवा ही सर्वच पक्षांपुढील मुख्य समस्या राहणार आहे.

शिवसेना-भाजपची युती किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी न झाल्यास प्रभागनिहाय उमेदवार मिळण्याची मोठी अडचण सर्वानाच भेडसावणार आहे. आरक्षण आणि प्रभागाचे नियोजित क्षेत्र स्पष्ट झाल्याशिवाय कोणत्या पक्षाकडे उमेदवारी मागायची, याचा निर्णय न घेण्याची हुशारी जाणकार कार्यकर्तेही दाखवत आहेत. चार सदस्यांच्या प्रभागाचा आकार यापूर्वीच्या तुलनेत खूपच मोठा राहणार असल्याने उमेदवारांचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे प्रचाराचे आतापासूनच झळकत असलेले इच्छुकांचे फलक हद्द ओलांडताना दिसू लागले आहेत. नव्या ठिकाणी आपली छाप पडावी, या हेतूने इच्छुक उमेदवारांकडून त्या त्या भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागले आहे. त्या त्या भागातील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्त्यांच्या छबी उमेदवारांच्या फलकांवर दिसू लागल्या आहेत. मोठा प्रभाग झाल्यास हक्काची मतपेढी निर्माण व्हावी, हे गणित डोक्यात ठेवून वर्गणी, देणगी, प्रायोजकत्व दिले जात आहे. मतदारांना देवदर्शन घडवून आणणाऱ्या यात्रा, सहलींचे आयोजन होऊ लागले आहे. वेगवेगळी कारणे देत जेवणाचे बेत होऊ लागले आहेत. अद्याप प्रभागरचना जाहीर झाली नसली तरी तयारीला सुरुवात झाली आहे. जसजसे निवडणुकांचे वातावरण तापू लागेल, तसे हे प्रकार आणखी वाढतील अशी सद्य:स्थिती राजकीय वर्तुळात आहे.