स्थायी समितीचे अंदाजपत्रक मंगळवारी; जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर?

महापालिकेचे सन २०८१-१९ या आर्थिक वर्षांसाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून येत्या मंगळवारी (२७ फेब्रुवारी) स्थायी समितीकडून हे अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक झाल्याचे दृश्य परिणाम या अंदाजपत्रकावर जाणवण्याची शक्यता असून स्थायी समिती अंदाजपत्रकात गेल्या वर्षीपेक्षा वाढ होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठीचे पाच हजार ९१२ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने केले होते. यामध्ये विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश करण्यात आला होता. प्रत्यक्षात अंदाजपत्रकात प्रकल्प आणि योजनांसाठी देण्यात आलेला निधी अन्य कामांसाठी देण्यात आला. त्यातून प्रकल्प तसेच योजनाही मार्गी लागल्या नाहीत आणि खर्चही वाढत गेला. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ न राहिल्यामुळे महापालिकेला वर्षभरात जवळपास सतराशे कोटींहून अधिक अंदाजपत्रकीय तुटीला सामोरे जावे लागले. या पाश्र्वभूमीवर आगामी वर्षांचे (२०१८-१९) अंदाजपत्रक वास्तवदर्शी करण्याचे आव्हान स्थायी समितीपुढे असणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या या अंदाजपत्रकाकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१८-१९ या वर्षांसाठीचे पाच हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला दिले आहे. हे अंदाजपत्रक अंतिम करण्याची प्रक्रिया स्थायी समितीकडून सुरु झाली आहे.

अंदाजपत्रकीय तुटीमुळे स्थायी समितीच्या अंतिम अंदाजपत्रकातही जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येण्याची शक्यता आहे. मेट्रो, नदी सुधार योजना, नदी संवर्धन योजना, समान पाणीपुरवठा योजनांना या अंदाजपत्रकात पुरेसा निधी मिळण्याची शक्यता असून वाहतूक, पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षणासाठीही भरीव तरतूद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अध्यक्षपदाची निवड ८ मार्चला

स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड येत्या आठ मार्च रोजी होणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह आठ जण स्थायी समितीमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे नव्या सदस्यांची निवड प्रक्रियाही गेल्या आठवडय़ात पूर्ण झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांना त्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार आठ मार्च रोजी निवडणूक होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.