पदपथांची रुंदी वाढवण्याचे काम सुरू; पदपथांवर अतिक्रमण

पुणे : पुण्यात नव्हे तर देशभरात प्रसिद्धीस असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील पदपथांची रुंदी वाढविण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता तसेच शहरातील अनेक रस्त्यांवरील पदपथांचे सुशोभीकरण आणि रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. लक्ष्मी रस्ता आधीच अरुंद आहे. पदपथांची रुंदी वाढल्यामुळे लक्ष्मी रस्ता आणखीनच अरुंद होणार आहे. व्यापारी तसेच छोटय़ा व्यावसायिकांनी लक्ष्मी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथांवर अतिक्रमण केले आहे. एकप्रकारे पदपथाचे रुंदीकरण म्हणजे व्यापाऱ्यांना अतिक्रमण करण्यासाठी आणखी प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यासारखे आहे, अशी टीका स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.

पदपथाची रुंदी वाढविण्यात आल्यामुळे पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालणे सोयीचे होईल, असा विचार महापालिकेकडून करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. नाना पेठेतील संत कबीर चौक ते टिळक चौकापर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील पदपथाची पाहणी केल्यास पदपथाच्या जागेवर दुकानदार, छोटे व्यावसायिक, पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. सध्या असलेल्या पदपथाचा वापर पादचाऱ्यांपेक्षा व्यापारी, पथारीवाले करत आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील लिंबराज महाराज चौक ते चित्रशाळा चौकादरम्यान असलेल्या उजव्या बाजूच्या पदपथाचे सुशोभीकरण आणि रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पदपथापेक्षा नवीन पदपथाची रुंदी एक ते दीड फुटाने वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे मूळ रस्त्याची रुंदी कमी होणार आहे, याचे भान महापालिकेला नाही. पदपथाची रुंदी वाढल्यामुळे पादचाऱ्यांना आरामात चालणे शक्य होईल, असा समज प्रशासनाचा आहे. मात्र, लिंबराज महाराज चौक ते चित्रशाळा चौक दरम्यान डाव्या बाजूच्या पदपथावर पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.

पदपथावर अतिक्रमण करण्यात आल्यामुळे खरेदीसाठी येणारे नागरिक पदपथापेक्षा रस्त्याचा वापर करतात, तसेच पदपथावर व्यापारी, दुकानदारांनी अतिक्रमणे केली आहेत. काही भागांत लोखंडी जाळय़ा टाकून जागा व्यापण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पदपथाचे रुंदीकरण केल्यामुळे तेथील अतिक्रमणांना अधिक प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यासारखे आहे, अशी टीका स्थानिक रहिवाशांनी केली आहे. बाजीराव रस्त्यावर लिंबराज महाराज चौक ते अप्पा बळवंत चौक दरम्यान पदपथाची रुंदी वाढविण्याचे काम सध्या सुरू आहे. तेथील परिस्थिती फारशी वेगळी नाही.

अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडी

लक्ष्मी रस्त्यावर लिंबराज महाराज चौकापासून उजव्या बाजूला असणाऱ्या पदपथाची रुंदी वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मूळ लक्ष्मी रस्ता अरुंद होणार आहे. लक्ष्मी रस्ता शहरातील महत्त्वाचा रस्ता आहे. या भागात शाळा आहेत. मोठय़ा प्रमाणावर वाहतूक असलेल्या या रस्त्यावर पदपथाची रुंदी वाढविण्याचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक आणखी विस्कळीत झाली आहे. परिणामी, या भागात आता दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूककोंडी होत आहे.

वाहतूक पोलिसांचा अभिप्राय नाही

महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनेक रस्त्यांवर कामे सुरू आहेत. काम सुरू करण्यापूर्वी पोलिसांकडून महापालिका प्रशासन किंवा ठेकेदार ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेते. एनओसी  घेतल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून अभिप्रायदेखील घेणे गैरजेचे असते, मात्र महापालिकेकडून फक्त एनओसी घेण्यात येते. अभिप्राय घेण्याचा विचारदेखील करण्यात येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस फक्त एनओसी देण्यापुरते आहेत. जंगली महाराज रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले. त्या वेळी वाहतूक पोलिसांकडून अभिप्राय घेण्यात आला होता. त्या वेळी जंगली महाराज रस्त्यावरील पदपथांची रुंदी वाढविण्यात आल्यामुळे या भागात कोंडी होईल तसेच तो वाहतुकीसाठी अपुरा पडेल, असा अभिप्राय देण्यात आला होता. जंगली महाराज रस्ता वगळता महापालिकेने आतापर्यंत वाहतूक पोलिसांकडून एकदाही अभिप्राय मागविला नाही. शेवटी रस्ता महापालिकेच्या ताब्यात असतो. पोलीस फक्त एनओसी देण्यापुरते, अशी टीका वाहतूक शाखेतील एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.