महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांबाबत नागरिकांना तक्रारी करण्यासाठी तसेच सूचना कळवण्यासाठी पालिका प्रशासनाने सोय करून दिली असून त्यासाठी खास अ‍ॅपही विकसित करण्यात आले आहे. या सुविधेचा प्रचार करण्यासाठी शहरात लागलेल्या कमानी सध्या चर्चेत असून बोल पुणेकर बोल.. असे आवाहन महापालिकेकडून जाहिरातींद्वारे नागरिकांना केले जात आहे.
सेवा-सुविधांसंबंधीच्या तक्रारी नक्की कोठे करायच्या याची माहिती नागरिकांना नसल्यामुळे अनेकदा तक्रारी केल्या जात नाहीत. महापालिकेच्या मुख्य भवनात तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही व्यवस्था असली तरी त्याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नाही. महापालिकेने काही वर्षांपूर्वी रस्त्यांवरील खड्डे तसेच अन्य प्रासंगिक समस्यांबाबत काही वेळा तक्रारी करण्यासाठी हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र नव्या योजनेत नागरिकांना तक्रारी करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी सध्या शहरभर जाहिराती केल्या जात असून ठिकठिकाणी असलेल्या कमानींच्या माध्यमातूनही या योजनेचा प्रचार केला जात आहे.
बोल पुणेकर बोल.. आपल्या तक्रारी सहज नोंदवा, असे आवाहन या जाहिरात कमानींवरून केले जात आहे. नागरिकांना फोनच्या माध्यमातून तसेच अ‍ॅपच्या माध्यमातून किंवा संकेतस्थळावर किंवा समाजमाध्यमांद्वारे महापालिकेकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी ८००१०३०२२२ हा टोल फ्री क्रमांकही महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांना महापालिका प्रशासनाबरोबर सहज संवाद साधता यावा तसेच सूचना करता याव्यात यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांना खड्डे पडतात आणि तो टीकेचा विषय ठरतो. त्यामुळे गेले काही वर्षे या संबंधीच्या तक्रारी करण्यासाठी नागरिकांना हेल्पलाईनची सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. नव्याने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेची व्याप्ती वाढवण्यात आली असून तक्रारी व सूचना करण्यासाठी अनेक माध्यमे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.