News Flash

अरुंदीकरणाचे धोरण वाहतुकीच्याच मुळावर!

शहराच्या मध्यवर्ती भागातील अरुंद रस्त्यांचा फटका वाहतुकीला बसत आहे.

अरुंदीकरणाचे धोरण वाहतुकीच्याच मुळावर!
संग्रहित छायाचित्र)

सुशोभीकरणाची ‘शोभा’

पुणे : पुनर्रचना आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्ते अरूंद करण्याचे महापालिकेने स्वीकारलेले धोरण वाहनचालकांच्या मुळावर आले आहे. शहरातील रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया ठप्प झालेली असताना असलेल्या रस्त्यांवरील वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र रस्ते वाहतुकीसाठी प्रशस्त कसे होतील, हे पाहण्यापेक्षा मुळातच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद करण्याचा उद्योग महापालिकेने सुरू केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जागोजागी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या धोरणामुळे पुणेकरांना भविष्यात तीव्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी मुळातच अरुंद असताना अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत शहराच्या काही प्रमुख रस्त्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव आणि फग्र्युसन रस्ता वाहतुकीसाठी अरुंद होणार आहेत. यापैकी काही रस्त्यांची कामेही पथ विभागाकडून सुरू झाली आहेत. मात्र रस्ता रुंदीकरण ठप्प असताना पुनर्रचनेचा  घाट घालण्याचा हा उद्योग आणि त्याला लोकप्रतिनिधींची असलेली साथ पुणेकरांना अडचणीत आणणारी ठरत आहे. जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचना केल्यानंतर किती वाहतूक कोंडी होते, वाहनचालकांना कसा त्रास होतो, हा अनुभव शहरातील वाहनचालक घेत आहेत. मॉडेल रोड या संकल्पनेनुसार अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स अंतर्गत ही कामे होत आहेत. त्यातच रस्ते एका बाजूने अरुंद होणार असल्यामुळे सुशोभीकरण आणि पुनर्रचनेच्या नावाखाली होणारी ही उधळपट्टी नक्की कोणासाठी सुरू आहे, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे.

अशी ही मार्गदर्शक तत्त्वे

शहराच्या मध्यवर्ती भागातील अरुंद रस्त्यांचा फटका वाहतुकीला बसत आहे. प्रमुख रस्त्यांसह मुख्य रस्त्यांना मिळणाऱ्या छोटय़ा जोड रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्याची आवश्यकता आहे. रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याऐवजी रस्त्यांची चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना करून रस्ते वाहतुकीसाठी अरुंद करण्यात येत आहेत. कोणत्या रस्त्याची काय गरज आहे, तेथे कोणत्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे, याचा विचार न करता केवळ मार्गदर्शक तत्त्वे आहेत म्हणून पुनर्रचना होणार असून त्यावरील कोटय़वधींची उधळपट्टी वादग्रस्त ठरणार आहे.

आणखी काही रस्त्यांची पुनर्रचना

जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचना केल्यानंतर लक्ष्मी रस्ता, कुमठेकर, टिळक, बाजीराव रस्ता, फग्र्युसन, केळकर, शिवाजी रस्त्यांची पुनर्रचना होणार आहे. हे सर्व रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या रस्त्यांना सुशोभीकरणाचा मुलामा लावण्यात येणार असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडणार आहे.

सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. रस्ते वाहतुकीसाठी अधिकाधिक मोकळे असावेत, पादचाऱ्यांना विनाअडथळा पदपथांवरून मार्गक्रमण करता यावे, अशी भूमिका महापौर मुक्ता टिळक यांनी घेतली होती. रस्ता रुंदीकरण हा त्यावर प्रमुख उपाय असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले होते. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाला सत्ताधारी भाजप कसा विरोध करणार, याकडेही पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2018 3:35 am

Web Title: pune municipal corporation making roads narrow
Next Stories
1 पुणे, पिंपरीतील भाजपच्या कारभारावर मुख्यमंत्री असमाधानी
2 महापौरपदासाठी गुणवत्तेला प्राधान्य
3 बायोमेट्रिक यंत्रणेकडे महाविद्यालयांचे दुर्लक्षच