आंदोलनांशिवाय अन्य कार्यक्रमांची गरज

काय चाललंय मनसे

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करताना शहराच्या सर्व भागांत संघटनात्मक बांधणी आणि नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठीचे प्रयत्न अशा दोन मुद्दय़ांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आखणी करावी लागणार आहे. सत्ताधारी पक्षांच्या विरोधातील आंदोलनांशिवाय मनसेला शहरात अन्यही कार्यक्रम राबवावे लागणार आहेत आणि ते राबवतानाच महापालिकेत पक्षाचे अधिकाधिक सदस्य असतील हेही पहावे लागणार आहे.

महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत मनसेचे दोन उमेदवार विजयी झाले. त्यापूर्वीच्या निवडणुकीत मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे महापालिकेत मनसेचा दबदबा होता. त्यानंतर मात्र मनसेचे प्रतिनिधित्व केवळ दोनच सदस्यांपुरते असल्याने पक्षाच्या कामगिरीला मर्यादा आल्या आहेत. महापालिकेतील आणि राज्यातील सत्ताधारी मनसेचे विरोधक असल्यामुळे या पक्षांनी घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात मनसेकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. मात्र मनसेचा कार्यक्रम आंदोलनांपुरताच मर्यादित राहिला आहे. पक्षसंघटनेची बांधणी आणि आगामी निवडणुकीची तयारी या दोन्हीसाठी पक्षाला बरीच तयारी करावी लागणार आहे.

मनसेला पक्ष म्हणून मानणारा मतदारवर्ग असला तरी पक्ष कार्यकर्त्यांचा, त्या त्या भागातील पदाधिकाऱ्यांचा स्थानिक संपर्क प्रभावी असणे आवश्यक आहे.

या मुद्दय़ावर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाकडून जी बांधणी करण्यात आली त्याचा उपयोग आगामी निवडणुकीसाठीही होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

मनसे अधिक

’ युवा मतदारांमध्ये काही प्रमाणात पक्षाचे आकर्षण

’ नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने

मनसे उणे

’ महापालिकेतील संख्याबळ

’ शहरात एकही आमदार नाही

निवडणूक प्रभाग किंवा वॉर्ड रचनेनुसार होईल. त्याचा निर्णय अद्याप झालेला नसला तरी दोन्ही पद्धतीने आम्ही संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. लोकांचे प्रश्न सातत्याने मांडणे, ते सोडवण्यासाठी आंदोलने हे कामही सुरू राहील. लोकांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे.

अजय शिंदे, शहराध्यक्ष

महापालिकेच्या २००७ मधील वॉर्डरचनेनुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकेका वॉर्डमध्ये आणि त्या वॉर्डच्या जवळच्या दोन-तीन वॉर्डमध्ये काम सुरू करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्या दृष्टीने तयारीच्या बैठकाही सुरू होत आहेत.

– बाबू वागसकर, मनसे नेते