शहरातील डेंग्यू रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तब्बल ७५० गृहनिर्माण संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे. सोसायटय़ांच्या आवारात साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्यांची पैदास आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

पावसाची सुरूवात होताच ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यास सुरूवात झाली. त्याचाच परिणाम म्हणून सोसायटय़ा, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. मात्र जनजागृती नंतरही अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये याबाबत पुरेसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. त्यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून या नोटीस बजावण्यात येत आहेत. जूनमध्ये सुमारे ३०० गृहनिर्माण संस्थांना याबाबत नोटीस देण्यात आली. त्यानंतर १७ जुलैपर्यंत ४५०हून अधिक गृहनिर्माण संस्थांना डेंग्यू डासांच्या उत्पत्तीची स्थळे आढळल्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी ही माहिती दिली.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षांत जानेवारीमध्ये चौदा, फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये आठ, एप्रिलमध्ये दहा आणि मेमध्ये सात डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. जूनमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या बत्तीसपर्यंत पोहोचली. जुलै महिन्यात १७ जुलैपर्यंत अकरा रुग्णांची डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्याबरोबर दिसून येणाऱ्या डेंग्यू रुग्णांच्या या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.