News Flash

गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तयार केलेल्या लोगोवरील टिळकांचे छायाचित्र हटवले

पुण्यात नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.

125th year of Ganeshotsav : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असून पालिका आणि सरकारकडून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला होता.

पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून यंदा गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. मात्र, यावर पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आक्षेप घेतला होता.यावरून गेल्या काही दिवसांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि पुणे महानगरपालिकेत वाद सुरू होता. अखेर या वादात पुणे महापालिकेने नमते धोरण स्वीकारले आहे. गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे विशेष बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यात आले होते. या लोगोवर सुरूवातीला लोकमान्य टिळकांचे चित्र होते. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने टिळकांचे चित्र बोधचिन्हावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. येत्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार होते. त्यामुळे आता यावरून पुण्यात नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या महापौर आणि लोकमान्य टिळकांचे वंशज असलेल्या मुक्ता टिळक आणि शैलेश टिळक यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गणेशोत्सव सुरू करण्यात लोकमान्य टिळकांचे मोठे योगदान होते. हा एकप्रकारे त्यांच्या योगदानाचा उत्सव होता. त्यामुळे हा निर्णय घेताना खूप वाईट वाटत आहे. मात्र, गणेशोत्सव शांततेने पार पडावा, यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु, लोकमान्यांनीच गणेशोत्सव सुरू केला या दाव्यावर आम्ही ठाम आहोत, असे मुक्ता टिळक यांनी सांगितले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असून पालिका आणि सरकारकडून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला होता. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी पुण्यातील गणेशोत्सवाला १८८२ पासून सुरुवात केली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजानिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. मात्र, आजवर झालेल्या उत्सवात त्यांच्या नावाचा उल्लेख देखील केला जात नाही. सुरूवातीच्या काळात तीन गणपती बसवले जात होते. त्यानंतर मानाच्या गणपतीचा उत्सव साजरा केला गेला. याच्या सर्व नोंदी इतिहासात पाहायला मिळतात. मात्र, सरकारकडून खऱ्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पुढील काळात महापालिकेने याची दखल घ्यावी. तसेच त्यांच्या नावाने हा उत्सव साजरा केला पाहिजे. तसेच यंदाचे वर्ष हे गणेशोत्वाचे १२६ वे वर्ष असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत महापौर आणि राज्य सरकारकडे गतवर्षापासून पाठपुरावा करण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असून याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाने दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2017 5:40 pm

Web Title: pune municipal corporation pmc remove lokmanya bal gangadhar tilak from 125th year of festivities of ganeshotsav
टॅग : Marathi,Marathi News,Pmc
Next Stories
1 ‘नो यू आर्मी’मध्ये ‘लव्ह अवर आर्मी’चा साक्षात्कार
2 पुण्यात महिला डॉक्टरची चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या
3 कॅबमध्येही परतीची लूट
Just Now!
X