गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या वतीने सर्व स्तरावरील तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील विविध १७ घाटांवर गणेश मूर्ती विसर्जनासाठी हौद, लोखंडी टाक्यांची सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली असून जीवरक्षकांची नियुक्ती आणि अन्य सुरक्षा यंत्रणा उभारण्याची सूचना सर्व पंधरा क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहे.

गणेशोत्सवसाच्या कालावधीत विसर्जन घाटांवर महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यंदाही संगम घाट, वृध्देश्वर घाट, अष्टभुजा मंदिर, बापू घाट, विठ्ठल मंदिर, ठोसरपागा, राजाराम पूल, चिमा उद्यान, वारजे-कर्वेनगर गल्ली क्रमांक एक, नेने-आपटे घाट, ओंकारेश्वर, पुलाची वाडी, गरवारे महाविद्यालयाची मागील बाजू, दत्तवाडी, औंधगांव, बंडगार्डन येथील विसर्जन घाटांवरील तयारी पूर्ण झाली आहे.

या परिसरातील सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच कंटेनर, निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून कीटकनाशक फवारणी पूर्ण झाली आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनाही दक्ष राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

जीवरक्षकांच्या नियुक्ती, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्याची सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहे. जलवाहिनी आणि मलवाहिन्यांच्या गळतीची कामे तत्काळ करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला असून आवश्यकतेनुसार मंडप, बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरत्या शौचालयांचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.