पुणे शहरासाठी 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज पुणे महानगरपालिकेचे 2020/21 वर्षाचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सादर केले. यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन दुसर्‍या लाटेसाठी 10 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचे या वर्षीचे (सन २०२१-२०२२) अंदाजपत्रक ई स्वरूपात सादर करण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक सादर झाले.

आगामी वर्षाकरिता अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या विशेष तरतुदी :

-अटलबिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी 146 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

-मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर नानाजी देशमुख कॅन्सर रुग्णालय उभारणीसाठी 1 कोटींची तरतुद

-पुणे महापालिकेच्या पाचही विभागात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी 5 कोटींची तरतूद

-नवीन कार्डियाक रुग्णवाहिका खरेदीसाठी 1 कोटींची तरतूद

-सिंहगड ते पुणे कॅन्टोन्मेंट, स्वारगेट ते कात्रज, शिवाजीनगर ते हडपसर, रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक, वारजे ते स्वारगेट या मार्गाचा डिपीआर तयार करण्यात आला आहे. यासाठी 3 कोटी 50 लाखांची तरतूद

-डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रात सुपर स्पेशालिटी युरॉलॉजी आणि युरो सर्जरी हॉस्पिटल 1 कोटी रूपयांची तरतूद

-शनिवारवाड्याजवळील पुणे महानगरपालिकेचा मुकुंदराव लेले दवाखान्याचे विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवांसाठी अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांवर योग्य पद्धतीने उपचार करता यावेत, विविध निदान चाचण्यांची सुविधा देता यावी यासाठी 1 कोटी रूपयांची तरतूद

-पादचारी हा रस्त्यावरील वाहतुकीचा राजा असून झेब्रा क्रॉसिंगवर पादचार्‍यांचा पहिला अधिकार असतो. पादचार्‍यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी शहराच्या विविध चौकांमध्ये आवश्यकतेनुसार पादचार्‍यांसाठी काउंट डाउन टाईमर असणारे सिग्नल बसविण्यात येणार आहेत. यासाठी 1 कोटी 50 लाख रूपयांची तरतूद