स्वॅब सेंटर तडकाफडकी बंद;प्राणवायू यंत्रणेसंबंधीची कामेही रखडवली

पुणे : धायरी येथील लायगुडे रुग्णालयातील कर्मचारी वर्गाचे स्थलांतर करुन, सिंहगड रस्ता परिसर हॉटस्पॉट असतानाही स्वॅब सेंटर तडकाफडकी बंद करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील प्राणवायू यंत्रणेसंबंधीची कामेही रखडवण्यात आली आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी लायगुडे रुग्णालय आधी आजारी पाडले आणि आता रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात आला आहे.

Paytm Payments Bank
Paytm पेमेंट्स बँकेला आणखी एक दणका! मनी लाँडरिंगप्रकरणी मोठा दंड, अर्थ मंत्रालयाची कारवाई
Why minimising or cutting out alcohol is one of the best fitness hacks
मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
viral video of rainbow panipuri
हळदीच्या पुऱ्या, पालकाचे पाणी… पाहा ‘रेनबो पाणीपुरी’चा व्हायरल Video!; नेटकरी म्हणतात, “नको…”

अ‍ॅरो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला लायगुडे रुग्णालय चालविण्यास देण्यात येणार आहे. अ‍ॅरो रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरांनी रुग्णालयाची बुधवारी पाहणी करुन दोन दिवसात रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणताही प्रस्ताव सादर न करता रुग्णालयाचे ऐन करोना संसर्गाच्या काळातील खासगीकरण वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

करोनाबाधित रुग्णांचा हॉटस्पॉट ठरलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील लायगुडे दवाखान्यातील स्वॅब सेंटर बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्राणवायू सुविधा कार्यान्वित करण्याची कामे रखडल्यामुळे करोनाबाधित रुग्णांना सुविधा असूनही येथे दाखल करुन घेतले जात नसतानाच सोमवारपासून स्वॅब सेंटरही बंद करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने बुधवारी (९ सप्टेंबर ) प्रसिद्ध केले होते. मात्र रुग्णालयाचे खासगीकरण करण्यासाठी हा सर्व खटाटोप महापालिका अधिकाऱ्यांनी केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. स्वॅब सेंटर बंद करण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग अन्यत्र स्थलांतरित करण्याची दक्षता घेण्यात आली. त्यानंतर आंबेगाव बुद्रुक येथील अ‍ॅरो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला लायगुडे रुग्णालय चालविण्याच्या हालचाली आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून सुरू झाल्या. बुधवारी विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले आणि अ‍ॅरो रुग्णालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. येत्या दोन दिवसात लायगुडे रुग्णालय अ‍ॅरो रुग्णालयाला चालविण्यास देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागालाही अंधारात ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात डॉ. दीपक पखाले यांच्याशी संवाद साधला असता खासगीकरण करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाची बुधवारी पाहणी झालेली नाही. खासगीकरणा बाबतची कोणतीही कल्पना नाही. रुग्णालयातील प्राणवायू यंत्रणेची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लायगुडे रुग्णालयातील कर्मचारी वर्ग अन्य रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. सध्या या रुग्णालयात केवळ बारुग्ण विभाग ( ओपीडी) आणि लसीकरण सुविधा सुरू आहे.

करोना संसर्गाच्या कालावधीत महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येणार नाही. लायगुडे रुग्णालयाचे खासगीकरणासंदर्भात माहिती घेतली जाईल. रुग्णालय कोणत्याही संस्थेस चालविण्यास दिले जाणार नाही. यासंदर्भात आरोग्य प्रमुखांशी तातडीने चर्चा करण्यात येईल.

— मुरलीधर मोहोळ, महापौर

लायगुडे रुग्णालयाच्या खासगीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव नाही. विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खासगीकरणाच्या हालचाली सुरू असल्यास त्याची माहिती घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येणार नाही.

– विक्रमकु मार, आयुक्त, महापालिका