News Flash

मंडपांमुळे रस्त्यांची चाळण

खड्डेविरहित मंडप संकल्पनेचा बोऱ्या

मंडपांमुळे रस्त्यांची चाळण

पुण्यातील रस्त्यांवर सव्वादोन लाख खड्डे; खड्डेविरहित मंडप संकल्पनेचा बोऱ्या

उत्सवासाठी उभारण्यात आलेले मंडप आणि झालर मंडपांमुळे (रनिंग मंडप) शहरातील सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. मंडपांसाठी सार्वजनिक मंडळांकडून सिमेंट काँक्रीटसह डांबरी रस्ते मोठय़ा प्रमाणात उखडण्यात आल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. शहरातील साडेतीन हजार सार्वजनिक मंडळांची संख्या गृहीत धरली, तर मंडप आणि झालर मंडपांसाठी किमान दोन लाख २५ हजार खड्डे मंडळांकडून घेण्यात आले आहेत. त्यामुळे खड्डेविरहित मंडप ही संकल्पनाच बासनात गुंडाळली गेली आहे.

यंदा महापालिकेने उत्सवासाठीचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार सिमेंट काँक्रीटचे रस्ते खड्डय़ांसाठी खोदण्यास मनाई आहे. मात्र या धोरणाची सर्रास पायमल्ली होत असून, मंडळांनी काही ठराविक अंतरापर्यंत टाकलेल्या रनिंग मांडवांमुळे प्रमुख रस्ते आणि चौकात जागोजागी खड्डय़ांचेच साम्राज्य झाले आहे.

मंडप उभारणीत ७० हजार खड्डे

मंडप उभारणी व झालर मंडप उभारणीची प्रक्रिया लक्षात घेता फक्त मंडपांसाठी ७० हजारांहून अधिक खड्डे घेण्यात आले आहेत. तर झालर मंडपासाठी घेण्यात आलेल्या खड्डय़ांची संख्या अंदाजे १ लाख ५० हजारांच्या आसपास जाते. याशिवाय मोठी मंडळे जाहिरातींसाठी बॉक्स कमानी उभारतात. त्यासाठीही खड्डे घेतले जातात.

जाहिराती अधिक, खड्डे अधिक

रनिंग मंडपासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दहा-दहा फुटांवर एक याप्रमाणे खड्डे खोदले जातात. किमान अर्धा किलोमीटर अंतरापासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत हे रनिंग मंडप उभारले जातात. त्याच्यावर प्रामुख्याने जाहिरातींचे बॅनर लावले जातात. उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचा खर्च ५० हजारांपासून सुरू होतो. मंडपाचा आकार वाढला की हा खर्चही वाढतो. मध्यम आणि लहान मंडळांची आर्थिक ताकद नसल्यामुळे ही मंडळे जाहिरातीतून उत्पन्न मिळवतात आणि त्यातून उत्सवाचा खर्च भागवतात. मात्र जाहिराती या रनिंग मंडपावरच केल्या जातात. त्यामुळे जास्तीत जास्त जाहिराती लावण्यासाठी रनिंग मंडपही मंडळापासून लांब अंतरापर्यंत टाकण्यात येतात. लांब अंतरापर्यंत टाकलेले हे रनिंग मंडपच रस्त्यांची चाळणी होण्यासाठीचे निमित्त ठरते.

  • शहरात मोठी, मध्यम आणि लहान अशी किमान साडेतीन हजार मंडळे असल्याची नोंद महापालिका आणि पोलिसांकडे आहे. शहरातील गल्लीबोळांमधील मंडळांचा समावेश त्यात नाही.
  • उत्सवासाठी किमान १० फूट रुंद व १० फूट लांबीचा मंडप उभारण्यात येतो.
  • मोठय़ा मंडळांचे मंडप हा ४० फूट रुंद आणि १० फूट लांबीचे असतात. १० फूट रुंद आणि १० फूट लांबीच्या मंडपासाठी सहा खड्डे घ्यावेच लागतात.
  • ४० फूट रुंद आणि १० फूट लांबीच्या मंडपासाठी १० पेक्षा जास्त खड्डे घ्यावे लागतात.
  • मोठय़ा मंडळांचे मांडव मोठे असल्यामुळे खड्डय़ांची संख्याही साहजिकच वाढते. त्यामुळे मोठय़ा मंडळांच्या मांडवांसाठी किमान ३० खड्डे घेतले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 2:14 am

Web Title: pune municipal corporation send notice to ganesh mandals
Next Stories
1 अनंत चतुर्दशीला दणदणाट!
2 शांताबाई.. झिंग झिंग झिंगाट!
3 वाहतुकीचा यंदा वर्तुळाकार मार्ग
Just Now!
X