सहकारनगर-धनकवडी, वारजे-कर्वेनगरात गटारांची दुरुस्ती

पुणे : पावसाळापूर्व कामे पूर्ण न झाल्यावरून महापालिकेवर टीका होत असतानाच महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराचा प्रकार पुन्हा एकदा पुढे आला आहे. सहकारनगर-धनकवडी, वारजे-कर्वेनगर परिसरात भर पावसाळ्यात आता पावसाळापूर्व कामे होणार आहेत. त्याबाबतची निविदा प्रशासनाकडून काढण्यात आली असून पावसाळी गटारे, चेंबर, मॅनहोल्स आणि सांडपाणी वाहिन्या दुरुस्तीची कामे या परिसरात भर पावसाळ्यात होणार आहेत.

दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात नालेसफाईचा विषय उपस्थित होतो. पावसाळ्यात करावयाची कामे पावसाळा तोंडावर आला तरी सुरूच राहात असल्यामुळे दरवर्षी या प्रकारची कामे वादात सापडतात. नालेसफाई, ओढे-नाल्यांमधील राडारोडा उचलणे, नदीतील घनकचरा आणि प्लास्टिक कचरा उचलण्याबरोबरच कल्व्हर्ट, पावसाळी गटारांची स्वच्छता या कालावधीत केली जाते. मात्र कोटय़वधी रुपये खर्च करूनही नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र सातत्याने पुढे आले आहे. यंदाही नालेसफाईची कामे करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आदेश असतानाही कामे वेळेवर पूर्ण करता आलेली नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे निमित्त त्यासाठी देण्यात आले. त्यामुळे पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकडून नालेसफाईची कामे एप्रिल-मे महिन्यात सुरू होऊ शकली नाहीत. त्यानंतर घाईगडबडीत ही कामे सुरू करण्यात आली. त्यानंतर ही कामे नव्वद टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र महापालिकेचा हा दावा फोल ठरला आहे.

सहकारनगर, धनकवडी, सिंहगड रस्ता, वारजे आणि कर्वेनगर परिसरात पावसाळापूर्व कामे करण्यासंदर्भात महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे.

राडारोडा उचलणे, शहाबादी फरशी बसविणे, मॅनहोलमधील गाळ काढणे, चेंबरची दुरुस्ती करणे, सांडपाणी वाहिन्यांची तपासणी करणे, काही ठिकाणी नव्याने सांडपाणी वाहिन्या टाकणे, नाल्यांलगत सीमाभिंत बांधणे, विद्युत दुरुस्ती करणे, पदपथ विकसित करणे अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे.  निविदेतील अटी-शर्तीप्रमाणे ही कामे पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या कामांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. मात्र ही कामे पावसाळ्यात होणार आहे.