पुणे महापालिका देशातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था

पुणे : तीन फूट उंचीच्या आतील लहान प्राण्यांच्या दहनासाठी नायडू मलनिस्सारण केंद्राच्या आवारात एक कोटी रुपयांच्या निधीतून स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. अशा स्वरूपाची स्वतंत्र स्मशानभूमी साकारणारी पुणे महापालिका  देशातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे.

लहान प्राण्यांमध्ये मांजर, कुत्रा, डुक्कर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न होता. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने हे प्राणी उकिरडय़ावर किंवा कचराकुंडीत टाकून दिलेले आढळून येत असत. त्यामुळे महापालिकेने मृत प्राण्यांच्या दहनासाठी स्वतंत्र स्मशानभूमी साकारण्याचा निर्णय घेतला.

पालिका अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसार एक कोटी रुपयांच्या निधीतून नायडू मलनिस्सारण केंद्राच्या आवारात प्राण्यांसाठी शवदाहिनी उभारण्यात आली आहे.  येथील गॅस शवदाहिनीमध्ये एका वेळी शंभर किलो वजनाच्या दोन किंवा तीन प्राण्यांचे दहन होऊ शकेल. त्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे दाहिनीमध्ये ८०० डिग्री तापमान असेल. तसेच एक हजार डिग्री इतक्या अतिरिक्त तापमानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार ही शवदाहिनी उभारण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एम. पी. शिंदे यांनी दिली.  अशा स्वरूपाची शवदाहिनी उभारणारी पुणे महापालिका ही देशातील एकमेव आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

प्राण्यांसाठी शवदाहिनी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

गेल्या काही दिवसांपासून भटक्या आणि बेवारस कुत्र्यांनी नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनाही भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याच्या अनुभवास सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि श्वानदंशाची लस या विषयी चर्चा सुरू झाली असताना पुणे महापालिकेने उभारलेली प्राण्यांसाठी शवदाहिनी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यामध्ये लक्ष घालून ही शवदाहिनी लवकर कार्यान्वित होईल यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मोठय़ा जनावरांसाठी लवकरच व्यवस्था

नायडू मलनिस्सारण केंद्राच्या आवारात मोठय़ा जनावरांसाठी लवकरच शवदाहिनी साकारण्यात येत आहे. जिल्हा नियोजन व विकास निधीतून पालकमंत्र्यांनी त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सहा महिन्यांत ही शवदाहिनी उभारण्यात येणार असून यामध्ये गाय, बैल, म्हैस आणि घोडा या जनावरांचे दहन होऊ शकेल, अशी माहिती एम. पी. शिंदे यांनी दिली.