News Flash

मेट्रो स्टेशनसाठी जागा देण्यास पुणे महानगरपालिकेची तयारी

महत्त्वाकांक्षी ट्रान्सपोर्ट हबसाठी तीन हेक्टर जागा देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे.

पुणे महानगरपालिका

स्थायी समितीपुढे लवकरच प्रस्ताव

स्वारगेट परिसरातील प्रस्तावित महत्त्वाकांक्षी ट्रान्सपोर्ट हबसाठी तीन हेक्टर जागा देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. त्यामुळे जागेअभावी अडचणीत सापडलेल्या ट्रान्सपोर्ट हबचा प्रश्न मार्गी लागणार असून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) ही जागा देण्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या आठवडाभरात स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

स्वारगेट-पिंपरी या मेट्रो मार्गिकेसाठी स्वारगेट परिसरातील जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम सहा महिन्यात सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट महिन्यात दिले होते. महामेट्रोकडून हे काम हाती घेण्यात येणार आहे. या ट्रान्सपोर्ट हबचा प्राथमिक आराखडा महामेट्रोकडून तयार करण्यात आला आहे. एकात्मिक वाहतूक आराखडय़ा अंतर्गत (इंटिग्रेटेड मल्टिमोडय़ुल ट्रान्सपोर्ट हब) महामेट्रोकडून जेधे चौकात हे काम प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महापालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) या संस्था मिळून एकत्रित हे काम करणार असल्या तरी महामेट्रोची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. किंबहुना समन्वयकाची भूमिका महाराष्ट्र रेल्वे मेट्रो कॉर्पोरेशनला (महामेट्रो) बजावावी लागणार आहे. त्यानुसार काही जागा महामेट्रोने महापालिकेकडे मागितल्या होत्या. स्वारगेट येथील जागेवर समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत साठवणूक टाक्यांची उभारणी होणार असल्यामुळे एवढी जागा देता येणार नाही, अशी भूमिका पाणीपुरवठा विभागाने घेतली आहे. त्यामुळे कमी जागेत ट्रान्सपोर्ट हब उभारता येणार का, असा प्रश्न निर्माण होऊन स्वारगेट येथील महामेट्रोच्या ट्रान्सपोर्ट हबची उभारणीही अडचणीत सापडली होती. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने चार ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले होते. मात्र तीन हेक्टर जागा देण्यास महापालिकेने तयारी दर्शविली आहे.

तीन हेक्टर जागेमध्ये महामेट्रोकडून स्टेशन उभारण्यात येणार आहे. उर्वरित जागा पाणीपुरवठा विभागाला मिळणार असून समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तेथे पाण्याच्या साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. मेट्रोला देण्यात येणारी जागा ही दीर्घकालीन भाडेकरारावर देण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 12:16 am

Web Title: pune municipal corporation to provide space for metro station
Next Stories
1 ‘लोकसत्ता’च्या वार्ताहराला मारहाण
2 पुण्यातील महिलांनी तयार केलेल्या गोधडीला परदेशात पसंती
3 बहारदार संतूरवादनाला रसिकांची मानवंदना
Just Now!
X