पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणात मिळून केवळ महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाणी बचतीच्या दृष्टीने शहरातील काही भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते असा विचार करता पालिकेकडून पाण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र कोथरूड भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत पाण्याची चोरी उघडकीस आली आहे. महत्त्वाचं म्हणजे गाड्या धुण्यासाठी पाण्याची चोरी केली जात होती. कारवाई करत महापालिकेने सोसायटीमधून 25 मोटरपंप जप्त केला आहेत. पुणे महापालिकेचे पाणी पुरवठा अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता ऑनलाइन व्ही. जी. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, ‘एरंडवणा येथील हिमाली सोसायटीत मोटारी लावून पाणी चोरी केली जात होती अशी माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता २५ मोटरपंपाच्या माध्यमातुन पाणी चोरून गाड्या धुण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याचे उघड झाले. यानंतर सर्व मोटरपंप जप्त करण्यात आले आहेत’.

मोटरपंप परत पाहिजे असल्यास प्रत्येक मोटरपंपाकरिता पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच पुन्हा अशा प्रकारची चोरी आढळल्यास त्या सोसायटीचा पाणी पुरवठा तोडला जाईल असंही व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. तसेच शहरातील कोणत्याही भागात अशा प्रकारची पाणी चोरी करणार्‍या कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.