एसएनडीटी येथील नवीन टाकी वापराविना; प्रशासनाचे दुर्लक्ष

महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महापालिका प्रशासन साठवणूक टाक्यांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात व्यस्त असतानाच अस्तित्वातील टाक्यांकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एसएनडीटी येथील टेकडीवर उभारण्यात आलेल्या जुन्या टाकीची दुरवस्था झाली असून नव्या टाकीचा वापरच प्रशासनाकडून होत नसल्याचे पुढे आले आहे. एका बाजूला समान पाणीपुरवठय़ासाठी आग्रह धरणाऱ्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीमधील दुजाभावही यानिमित्ताने स्पष्ट झाला आहे.

एसएनटीडी येथील टेकडीवर एरंडवणा, भांडारकर रस्ता, प्रभाग रस्त्यासह अन्य काही भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ४५ वर्षांपूर्वी टाकी बांधण्यात आली. त्यानंतर दहा वर्षांपूर्वी या टाकीला पर्यायी म्हणून नवीन टाकी बांधण्यात आली. जुनी टाकी ही दहा लाख लिटर क्षमतेची असून नव्याने उभारण्यात आलेल्या टाकीची क्षमता ही सत्तर लाख लिटर अशी आहे. मात्र या दोन्ही टाक्यांचा योग्य वापर होत नसल्याचे सजग नागरिक मंचाला आढळून आले आहे. त्यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदनही पाठविले आहे. त्याबाबतची माहिती मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी पत्रकारांना गुरुवारी दिली.

‘दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या टाकीसाठी घेण्यात आलेले पंप आणि पंपहाऊस वापराविना पडून आहे. पंचेचाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्या टाकीच्या स्लॅबला अनेक ठिकाणी तडे गेले असून स्लॅब धोकादायक झाला आहे. त्या टाकीवर बांधलेल्या दोन चिमण्यांचीही पडझड झाली असून स्लॅबमधून घाण पाणी, कचरा अशा गोष्टी टाकीत पडत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून या टाकीतील पाणीच या भागातील नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे या जुन्या टाक्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असून नव्याने उभारण्यात आलेल्या टाकीचा वापर करणे आवश्यक असल्याचे,’ वेलणकर यांनी सांगितले.

महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महापालिका प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात साठवणूक टाक्यांच्या उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र नव्या टाक्या बांधण्याच्या नादात जुन्या अस्तित्वातील टाक्यांच्या दुरवस्थेकडे पाहण्यास प्रशासनाला वेळ नसल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यावर चौकशी समिती नेमण्याऐवजी वेळीच जुन्या टाकीची दुरुस्ती करून नव्या टाकीचा वापर करावा, अशी मागणीही वेलणकर यांनी केली आहे.