कोटय़वधीच्या प्रशिक्षणाचा प्रस्ताव मंजूर करण्याचा स्थायी समितीमधील सदस्यांचा चंग

महापालिका शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना तब्बल ३ कोटी ९० लाख रुपये खर्च करून अ‍ॅबॅकसचे प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावाला जोरदार विरोध झाला तरी तो मंजूर करण्याचा चंग स्थायी समितीमधील सदस्यांनी बांधला असून हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी बुधवारी आणखी एक धूर्त चाल खेळण्यात आली. त्यानुसार आता हे प्रशिक्षण मोफत देणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागवावेत व दर्जेदार संस्था पुढे न आल्यास सध्याच्याच संस्थेला प्रशिक्षणाचे काम द्यावे, असा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

महापालिका विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांना अ‍ॅबॅकसचे प्रशिक्षण देण्यासाठी मोठा खर्च करण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याच्यावर मोठी टीका झाली. त्यामुळे प्रस्ताव तर मंजूर करायचा; पण टीका नको अशी खेळी स्थायी समितीच्या सदस्यांनी खेळली आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्दबातल करा अशी मागणी करणारे सदस्यही या खेळीत सहभागी झाले आहेत. अ‍ॅबॅकसचे प्रशिक्षण देण्यासाठी शहरातील ज्या संस्था इच्छुक असतील त्यांच्याकडून प्रस्ताव मागवावेत व त्यासाठी जाहिरात द्यावी, असा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. तसेच प्रशिक्षण विनामूल्य देण्याची तयारी असणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागवावेत तसेच समाधानकारक स्पर्धा न झाल्यास किंवा दर्जेदार संस्था पुढे न आल्यास हे प्रशिक्षण देण्याचे काम आधीच्याच संस्थेला द्यावे, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या मंजूर झालेल्या प्रस्तावाला फेरविचाराचा प्रस्ताव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. त्या नंतर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानेही फेरविचार प्रस्ताव दिला होता. मात्र या पक्षांच्या स्थायी समितीमधील सदस्यांनी त्यांची भूमिका बदलली असून प्रस्ताव मान्य कसा होईल यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून जाहिरात देण्याचा प्रस्ताव बुधवारी मंजूर करण्यात आला आहे.

जाहिरात दिल्यानंतर एक-दोन संस्था पुढे आल्यास समाधानकारक स्पर्धा झाली नाही असे कारण दाखवून मूळ प्रस्ताव मंजूर केला जाईल. किंवा आलेल्या संस्था दर्जेदार नाहीत असे कारण दाखवून त्यांना बाद केले जाईल.