शिवसेनेचे मंत्री वर्षा बंगल्याजवळ राजीनामे घेऊन फिरत असतात, पण राजीनामे देत नाही. मग आता तुमचा मराठी बाणा कुठे गेला ? असा खोचक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला विचारला आहे. शिवसेना – भाजपमधील भांडण खालच्या थरावर गेले असले तरी ते  फक्त दिखाव्या पुरताच सुरु असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

औंधमधील बोपडी येथे शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचारसभा घेतली. या सभेत चव्हाण यांनी भाजप आणि शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते. पण आता ते देश आरक्षण मुक्त करु अशी घोषणा देतात असे सांगत चव्हाण यांनी संघनेत्यांच्या आरक्षणविरोधी विधानांकडे लक्ष वेधले.
केंद्र सरकारने इंदिरा गांधी आवास योजनेचे नाव बदलून पंतप्रधान आवास योजना असे केले. त्यांना इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे नाव चालत नाही. हे सरकार गेम चेंजर नाही तर फक्त नेम चेंजर (नाव बदलणारे) आहे असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसचा नोटाबंदीला विरोध नाही. फक्त नोटाबंदीच्या निर्णयाची ज्यापद्धतीने अंमलबजावणी झाली त्याला आमचा विरोध होता असे त्यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीच्या काळात १०० अध्यादेश काढले. रिझर्व्ह बँक ही संघाची शाखा असल्यासारखी काम करत होती अशी टीकाही त्यांनी केली. सर्व सामान्य नागरिकांना २ हजारच्या नोटाही मिळाल्या नाही. मग मंत्र्यांना लगेच नोटा कशा मिळाल्या असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नागपूरसोबतच पुणे मेट्रोचे काम सुरु होण्याची गरज होती. हे सरकार फक्त घोषणा देते. पुण्याचा विकास काँग्रेसनेच केला असा दावाही चव्हाण यांनी याप्रसंगी केला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील भाजपवर टीका केली. नळावर ज्याप्रमाणे भांडण सुरु असते, त्याप्रमाणे सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये भांडण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. काम केले नसल्याने ते भांडत असून ही फक्त नौटंकी सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेला फसवण्यात आले. या सरकारने राज्याचे वाटोळे केले असून जनता या सरकारला वैतागली आहे. काँग्रेसशिवाय जनतेला पर्याय नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.