खासदार काकडे यांच्या घोषणेनंतर पालकमंत्र्यांकडून सबुरीचा सल्ला

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर इतर पक्षांतील २० ते २५ नगरसेवक आणि प्रमुख शंभर कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे खासदार संजय काकडे यांनी जाहीर केल्यानंतर ‘त्यापेक्षाही कदाचित जास्त पक्षप्रवेश होतील; पण त्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतील,’ असे प्रतिपादन करून बापट यांनी काकडे यांना अप्रत्यक्षपणे गुरुवारी सबुरीचा सल्ला दिला. पक्षात प्रवेश दिले जातील; पण ते काही निकषांवर दिले जातील असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी सरसकट सर्वाना प्रवेश मिळणार नाही असेही स्पष्ट केले.

खासदार काकडे यांनी अन्य पक्षातील ज्या ज्या लोकप्रतिनिधींना तसेच कार्यकर्त्यांना भाजपमध्ये अलीकडे प्रवेश दिले आहेत, ते वादग्रस्त ठरले असून त्यामुळे भाजपवर जोरदार टीका होत आहे. काकडे यांनी प्रवेशाचे जे कार्यक्रम घडवून आणले त्यामुळे पक्षातही अस्वस्थता आहे. त्याबाबतच्या तक्रारी प्रदेश पदाधिकाऱ्यांकडेही करण्यात आल्या आहेत. ही टीका सुरू असतानाच काकडे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आणखी काही जण भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार २० ते २५ नगरसेवक आणि १०० प्रमुख कार्यकर्ते येत्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच या इच्छुकांच्या पक्षप्रवेशाची माहिती शहर भाजपमधील पदाधिकाऱ्यांना आहे, असाही दावा काकडे यांनी केला आहे.

काकडे यांच्या घोषणेमुळे भाजपमध्ये कोणाला प्रवेश दिले जाणार याची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी या संदर्भात पालकमंत्री बापट यांनी मात्र गुरुवारी सूचक वक्तव्य करत काही पथ्ये पाळण्याचा अप्रत्यक्ष सल्ला काकडे यांना दिला. शंभरच काय यापेक्षाही जास्त जण कदाचित पक्षात येतील. पण त्यासाठी काही नियम व निकष असतील, याकडे बापट यांनी लक्ष वेधले. अन्य पक्षातील अनेक पदाधिकारी पक्षात येण्यास इच्छुक आहेत. मात्र पक्ष प्रवेश देताना निश्चितपणे काळजी घेतली जाईल. यापूर्वीही काहींचे प्रवेश नाकारण्यात आले आहेत.

खासदार काकडे यांनी ज्यांचे पक्षप्रवेश केले ते कार्यक्रम थेट मुंबईत घडवून आणले. त्या बाबत ‘कोणचाही पक्षप्रवेश होताना त्याची माहिती शहर पदाधिकाऱ्यांना असेल. त्यांच्याकडूनच ही यादी मुख्यमंत्र्यांकडे जाईल,’ असेही बापट यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे शहर पदाधिकाऱ्यांकडे पक्षप्रवेशाची सूत्रे राहतील हेही स्पष्ट झाले आहे.