पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या सर्व साधारण गटासाठी सोडत निघालेली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांना, तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांनी अर्ज दाखल केला आहे. आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश कदम आणि काँग्रेसच्या चांदबी नदाफ यांनी अर्ज दाखल केला आहे. महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

राज्यातील महापालिकांच्या महापौरपदासाठी सोडत मागील आठवड्यात पार पडली आहे. या सोडतीत पुणे महानगरपालिकेचे महापौरपद हे खुल्या सर्व साधारण गटासाठी गेले आहे. त्यामुळे भाजपाकडून नगरसेवक धीरज घाटे, सुशील मेंगडे, मुरलीधर मोहोळ आणि राजाभाऊ लायगुडे या सर्वांची नावे महापौरपदासाठी चर्चेत होती. मात्र, अखेर भाजपकडून कोथरूड मधून विधानसभा निवडणुकी दरम्यान डावलण्यात आलेले मुरलीधर मोहोळ यांना तर, उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांना संधी देण्यात आली. राज्यसभा खासदार संजय काकडे, शहर अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थितीमध्ये मुरलीधर मोहोळ आणि सरस्वती शेंडगे यांनी अर्ज दाखल केला.

तर दुसरीकडे आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश कदम आणि काँग्रेसच्या चांदबी नदाफ यांना संधी देण्यात आली. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांच्या उपस्थितीत प्रकाश कदम आणि काँग्रेसच्या चांदबी नदाफ यांनी अर्ज दाखल केला आहे. आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक २२ तारखेला होणार असली तरी देखील, महापालिकेतील भाजपाचे संख्या बळ लक्षात घेता, भाजपाचेच महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित मानले जात आहे.
महापौरपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा असणार : माधुरी मिसाळ

महापौर, उपमहापौरपदी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार मुरलीधर मोहोळ, सरस्वती शेंडगे यांना संधी देण्यात आली आहे. या दोन्ही पदांचा कार्यकाळ एक वर्षाचा राहणार आहे, आरपीआयचे नेते आणि आमच्यामध्ये उपमहापौर पदावरून कोणत्याही प्रकाराचा वाद नाही. तसेच त्यांच्या पाच नगरसेवकांना मागील अडीच वर्षात उपमहापौर, स्थायी समिती आणि इतर समित्यांमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी नाराज होण्याचा प्रश्न येत नाही. येत्या काळात समितीमध्ये संधी दिली जाणार असल्याचेही भाजपा शहर अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.