वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी गेली १६६ वर्षे कार्य करीत असलेल्या पुणे नगर वाचन मंदिरातर्फे आधुनिकतेची कास धरीत दुर्मिळ ग्रंथसंपदेच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला आहे. आपल्या संग्रहातील ग्रंथांचे डिजिटायझेशन करतानाच अन्य संस्था आणि व्यक्तींच्या संग्रहातील ग्रंथांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संस्थेच्या डिजिटायझेशन समितीचे प्रमुख प्रमोद कुलकर्णी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष माधव सोमण, श्रीनिवास जनार्दन मोडक आणि राजीव मराठे या वेळी उपस्थित होते. मिटकॉनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप बावडेकर यांच्या हस्ते शनिवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजता या उपक्रमाचा आरंभ होणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात २५० ग्रंथांमधील ५० हजार पृष्ठांचे डिजिटायझेशन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कामासाठी सुमारे सात लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी चार लाख रुपये किमतीची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे. किशोर गुळगुळे हे डिझिटायझेशनचे काम करणार आहेत.
डिझिटायझेशनसाठी पुस्तकांची अतिदुर्मिळ, दुर्मिळ आणि गेल्या ५० वर्षांतील पुस्तके अशी प्रतवारी करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात या पुस्तकांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. भविष्यात ई-बुक स्वरूपात जतन करण्याचा प्रयत्न आहे. मूळ पुस्तकाला धक्का न लावता डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. संशोधक आणि अभ्यासकांना अल्प दरामध्ये हे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संस्थेला अग्निहोत्र, ऋग्वेद आणि अथर्ववेदातील वैदिक संहिता आणि आयुर्वेदाच्या दुर्मिळ हस्तलिखितांसह टेंबे स्वामींनी लिहिलेल्या द्विसहस्री गुरुचरित्र, समश्लोकी गुरुचरित्र आणि दत्तमाहात्म्य या ग्रंथांची दुर्मिळ प्रत मिळाली आहे.