25 March 2018

News Flash

‘शिवशाही’ सुरू करून ‘शिवनेरी’ बंद!

एसटीच्या शिवनेरी गाडय़ांना सर्वच मार्गावर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या

प्रतिनिधी, पुणे | Updated: December 8, 2017 4:54 AM

पुणे- नाशिक मार्गाबाबत निर्णय; ‘शिवनेरी’च्या प्रवाशांची नाराजी

पुणे- नाशिक मार्गावर प्रवाशांना आता शिवनेरी बसची सेवा मिळू शकणार नाही. कारण या मार्गावरील शिवनेरी आणि हिरकणी या दोन्ही प्रकारातील बस बंद करून केवळ ‘शिवशाही’ गाडय़ा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे आणि नाशिक या दोन्ही विभागांनी घेतला आहे. ‘शिवनेरी’पेक्षा कमी तिकिटात वातानुकूलित प्रवास देण्यासाठी पुणे- नाशिक मार्गावर शिवशाही गाडय़ा सोडण्यात येत असल्या, तरी ‘शिवनेरी’ने नियमित प्रवास करणारा एक वर्ग असून, या प्रवाशांकडून मात्र एसटीच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

एसटीच्या शिवनेरी गाडय़ांना सर्वच मार्गावर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सेवेच्या तिकिटांचा दर अधिक असला, तरी याच गाडीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. अलीकडेच एसटीच्या ताफ्यामध्ये शिवशाही गाडय़ांचा समावेश करण्यात आला आहे. या गाडय़ाही     वातानुकूलित असून, विविध सुविधांनी सज्ज आहेत. या गाडय़ांचा तिकीट दर शिवनेरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे कमी दरामध्ये प्रवाशांना वातानुकूलित प्रवास करण्याचा आनंद देण्यासाठी शिवनेरीची सेवा बंद केली असल्याचे एसटीकडून सांगण्यात येत आहे.

पुण्याहून नाशिकसाठी चार शिवनेरी आणि आठ हिरकणी गाडय़ा सोडण्यात येत होत्या. नाशिक विभागातूनही पुण्यासाठी चार शिवनेरी आणि आठ हिरकणी गाडय़ा सोडण्यात येत होत्या. या सर्व गाडय़ा इतर विभागात वळविण्यात आल्या असून, पुणे- नाशिक मार्गावर आता केवळ शिवशाही प्रकारातील गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. पुणे आणि नाशिक विभागातून प्रत्येकी दररोज १२ शिवशाही गाडय़ा सोडण्यात येत आहेत. कमी तिकीट दरामध्ये वातानुकूलित सेवा मिळत असली, तरी शिवनेरी गाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी होती. अधिक पैसे देऊन या गाडीने प्रवास करणारा ठरावीक वर्ग आहे. त्याची या गाडीला पसंती आहे. ती बंद केल्याने या प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर निघत आहे.

हिरकणीच्या प्रवाशांना वाढीव दराचा भरुदड

शिवनेरी गाडय़ांचे मोठय़ा दराचे तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांबरोबर हिरकणीसारख्या साध्या गाडीतून कमी दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही एक वर्ग आहे. पुणे- नाशिक मार्गावर शिवनेरीसह हिरकणी गाडय़ाही बंद करून केवळ शिवशाही गाडय़ा सुरू करण्यात आल्याने हिरकणीच्या प्रवाशांना नाहक भरुदड सोसावा लागणार आहे. हिरकणीपेक्षा शिवशाही गाडय़ांचा तिकीट दर दहा टक्क्य़ांनी अधिक आहे. हिरकणीच्या प्रवाशांना आता पुणे- नाशिक प्रवासासाठी दहा टक्के जादा रक्कम मोजावी लागणार आहे.

शिवनेरी गाडीसाठी सर्वाधिक भाडे आहे. हिरकणी ही निमआराम गाडी असल्याने या गाडीला तुलनेने कमी तिकीट आहे. मात्र, शिवशाही गाडी पूर्णपणे आरामगाडी आहे. त्यात वातानुकूलित यंत्रणा, मोबाईल चार्जिगची सुविधाही आहे. हिरकणीपेक्षा या गाडीला केवळ दहा टक्के जादा तिकीट आकारले जाते. कमी पैशात चांगली सेवा देण्याचा उद्देश आहे.

श्रीनिवास जोशी, एसटी पुणे विभाग नियंत्रक

First Published on December 8, 2017 4:54 am

Web Title: pune nashik shivneri bus closed shivshahi bus
  1. S
    sanjay
    Dec 8, 2017 at 9:46 am
    तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे? कमी पैसे देऊन जर शिवनेरी सारखाच एअर कंडिशन प्रवास होतोय तर तुमचे काय नुकसान झाले? समाजातील काही लोक तर १५ रुपयाची पाण्याची बाटली जिथे ५० रुपयाला मिळते तिथे जाण्यासाठी १०० रुपयाचे पेट्रोल खर्च करून जातात आणि तिथून च घेतात .......अश्या लोकांची संख्या किती आहे समाजात? कशाला त्यांची भलावण करतात ? सामान्य लोकांचा फायदा होतोय तर चांगले च आहे ना....ज्यांना वोल्वो ने च जायचेय त्यांना खाजगी ्या आहेत ना उपलबध? ५०० रुपयाची अंडरपँड वापरणाऱ्याने जर ती ५० ला मिळायला लागली तर वाईट वाटून घेण्यापेक्षा दुसरा १००० रुपया वाला ब्रँड शोधावा आणि घालावी १००० वाली अंडरपँड ....
    Reply