बहुप्रतीक्षित पुणे- नाशिक नव्या रेल्वेमार्गाची घोषणा अखेर रेल्वे मंत्र्यांनी केल्यानंतर प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा मार्ग पुणे व नाशिक या दोन शहरांबरोबरच या मार्गात येणाऱ्या विभागांसाठी विकासमार्ग ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे- नाशिक या दोन शहरांना जोडणाऱ्या नव्या रेल्वेमार्गाची मागणी मागील पंधरा वर्षांपासून करण्यात येत होती. सुमारे आठ वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना सर्वप्रथम या मार्गाच्या सर्वेक्षणाचा विषय रेल्वे अंदाजपत्रकात आला. ममता बॅनर्जी यांच्या काळातही या विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०११- १२ च्या रेल्वे अंदाजपत्रकातही हा विषय घेण्यात आला. मात्र, त्यानंतरही सर्वेक्षणाच्या पलीकडे या मार्गाने काम जाऊ शकले नाही. रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी रेल्वेच्या पुरवणी अंदाजपत्रकात बुधवारी पुणे- नाशिक या रेल्वे मार्गाची घोषणा केली व त्यामुळे हा मार्ग होण्यावर शिक्कामोर्तब झाले.
नवा मार्ग होण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागणार असला, तरी त्यामुळे दोन्ही शहरांना व हा मार्ग जाणाऱ्या भागातील प्रवासी, शेतकरी व व्यापारी यांना मोठय़ा प्रमाणावर फायदा होणार आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्वीच झाला असता तर त्यासाठी खर्च कमी लागला असता, असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा यांनी व्यक्त केले.
सध्या रेल्वेने नाशिकला जाण्यासाठी कर्जत, पनवेल, कल्याणमार्गे जावे लागते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. त्यातून सध्याच्या रेल्वे सेवेला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. नवा लोहमार्ग राजगुरूनगर, आळेफाटा, नारायणगाव, संगमनेर असा असणार आहे. त्यामुळे रेल्वेमार्गे पुणे- नाशिक हे अंतर २६० किलोमीटरचे होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळही वाचणार आहे. मार्गाच्या मधल्या पट्टय़ातील व ग्रामीण विभागातील प्रवाशांना त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना या नव्या मार्गाचा मोठय़ा प्रमाणावर फायदा होऊ शकणार आहे.