News Flash

पुणे : गे जोडीदाराचं ठरलं लग्न… वेगळं होण्याच्या भीतीतून केली जोडीदाराचीच हत्या

संशोधक विद्यार्थ्याच्या हत्येचा झाला उलगडा

पुण्यातील राष्ट्रीय रसानयशास्त्र प्रयोगशाळेत (National Chemical Laboratory)पीएच. डी करणाऱ्या एका ३० वर्षीय संशोधक तरुणाची हत्या करून फेकून दिलेला मृतदेह आढळून आला होता. या तरुणाची हत्या नेमकी कुणी व कशासाठी केली असेल? असा प्रश्न पुण्यात चर्चिला जात होता. मात्र, हत्येचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना तीन-चार दिवसातच यश मिळालं आहे. मयत तरुणाचे एका २४ वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मागील आठ महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत होते. अचानक संशोधक तरुणाचं लग्न ठरलं. या लग्नाच्या वादातून गे जोडीदाराने हत्या केली, असं पोलीस तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील पाषाण येथे असलेल्या राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेत ३० वर्षीय सुरदर्शन बाबुराव पंडित हा तरुण पीएच.डी करत होता. सुदर्शन जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात असलेल्या सुतारवाडीचा रहिवासी आहे. २६ फेब्रवारी रोजी सुस येथील खिंडीत सुदर्शनचा चेहरा विद्रुप केलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली होती. सुदर्शनची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. तपासानंतर जे समोर आलं, ते ऐकून पोलिसही चक्रावले.

कशामुळे झाली हत्या?

चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रसानयशास्त्र प्रयोगशाळेत पीएचडी करणाऱ्या सुदर्शनची रविराज राजकुमार क्षीरसागर या २४ वर्षीय तरुणासोबत डेटिंग अॅपवरून भेट झाली होती. आठ महिन्यांपूर्वी दोघे एकमेकांना भेटले आणि तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. दरम्यान, अलिकडेच सुदर्शन पंडित याचं लग्न ठरलं. सुदर्शनच्या लग्नाला रविराजने विरोध केला. लग्नामुळे सुदर्शन दूर जाईल, अशी भीती त्याला वाटत होती. लग्नावरूनच दोघांमध्ये वाद झाले, अशी माहिती शेवाळे यांनी दिली.

आणखी वाचा- पुण्यात म्हशीला पाणी पाजण्याच्या वादातून गोळीबार; एकाची हत्या

२६ फेब्रवारीला काय घडलं?

लग्न ठरल्याचं कळल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी रविराज सुदर्शनला पाषाण हिल परिसरात घेऊन गेला. तिथे रविराजने सुदर्शनचा गळा चिरला आणि त्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून दगडाने त्याचा चेहरा विद्रुप केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितलं. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर शेवटचं लोकेशन पाषाण हिल आढळून आलं. त्याचबरोबर सुदर्शन रविराजसोबत होता, असं कळलं. त्यानंतर पोलीस रविराजचा शोध घेत त्याच्या घरी पोहोचले. मात्र, तिथे गेल्यानंतर रविराजनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 10:18 am

Web Title: pune ncl murder case 24 yr old man booked was in relationship with research fellow for 8 months bmh 90
Next Stories
1 ‘निवडणूक वर्षां’मुळे नगरसेवकांच्या हाती हजार कोटी
2 महापालिकेचे ८ हजार ३७० कोटींचे अंदाजपत्रक
3 लसीकरणाचा पुण्यामध्ये सावळा गोंधळ
Just Now!
X