पुण्यातील कात्रज घाटात एका दिवसाच्या बाळाला कचऱ्यात सोडून गेल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. या घटनेला काही दिवस होत नाही तोच काल(दि.२२) सायंकाळच्या सुमारास खराडी येथील दर्ग्याजवळ चार महिन्याच्या बाळाला सोडून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “खराडी येथील दर्ग्याजवळ एक बाळ रडत असून बाळाजवळ कोणीही नाही अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार दामिनी पथक घटनास्थळी दाखल झाले. तिथून बाळाला घेऊन, पोलिस स्टेशनमध्ये आलो. त्यानंतर काही वेळाने ससून रुग्णालयात बाळाला दाखल करण्यात आहे. बाळाला कोण सोडून गेलं याचा शोध सुरू असून आसपासच्या भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू आहे”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली.

(Video: शेवटी ती पण एक आईच! पुण्यात कचऱ्यात टाकलेल्या बाळाला वाचवण्यासाठी महिला पोलिसाची धावाधाव)

दरम्यान, गेल्या आठवड्यातच कात्रज घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात अवघ्या एका दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या बाळाची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे यांनी धाव घेतली. मधुरा कोराणे यांनी तिथून बाळाला घेऊन ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून आता बाळाची प्रकृती ठणठणीत आहे व उपचार सुरू आहेत.