करोना रुग्णवाढ… रेमडेसिवीरचा तुटवडा.. रुग्णांना बेड मिळेना… ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू… या आणि अशा अनेक घटनांचा पुणेकरांच्या मनावर परिणाम होताना दिसत आहे. होय… करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुण्यातील परिस्थिती बिकट झाली असून, बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याने रुग्ण व नातेवाईकांचे अतोनात हाल होताना दिसत आहे. या वातावरणामुळे पुण्यातील नागरिकांच्या मनावर नकरात्मक परिणाम होत आहे. भीती आणि शंका दूर करण्यासाठी नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या कंट्रोल रुममध्ये दिवसाला ९ ते १० हजार पुणेकर फोन करत आहेत.

पुण्यात करोनाचा उद्रेक झाल्यापासून सातत्याने निर्बंध वाढवले जात आहेत. तर दुसरीकडे प्रसारावर अद्यापही नियंत्रण आलेलं नसल्याची स्थिती आहे. काळजीची बाब म्हणजे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. लॉकडाउन आणि बेडच्या तुटवड्यावरून बरीच चर्चा सुरू आहे. याचा परिणाम पुणेकर नागरिकांच्या मानसिकतेवर होत असल्याचं दिसून येत आहे.

आणखी वाचा- पिंपरी-चिंचवड : मध्यरात्री निर्माण झाली ऑक्सिजनची टंचाई; अधिकारी, पोलिसांनी अशाप्रकारे वाचवले अनेकांचे प्राण

पुण्यात वैद्यकीय सेवेतील कंट्रोलमध्ये नागरिकांचे फोन करण्याचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. दिवसाला ९ हजार ते १० हजार नागरिकांचे फोन कंट्रोल रुममध्ये येत आहे. करोनाशी संबंधित आपातकालीन स्थिती आणि इतर गोष्टींसंदर्भात हे फोन केले जात आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण वाढलं असून, करोनाशी संबंधित फोन करणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं असल्याची माहिती कंट्रोल रुमच्या व्यवस्थापकांनी दिली.

पुण्यात सोमवारी ५ हजार १३८ रुग्णांची नोंद, ५५ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात सोमवारी (२० एप्रिल) दिवसभरात ५ हजार १३८ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण करोना रुग्णांचा आकडा ३ लाख ७६ हजार ९६२ इतका झाला आहे. सोमवारी दिवसभरात पुण्यात ५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत ६ हजार २१८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दिवसभरात ६ हजार ८०२ जणांना घरी सोडण्यात आलं आहे.