राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेले दोन्ही अर्ज पुण्यातील लष्करी न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. मात्र, तिच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केल्या जात असून, या प्रकरणात संजय राठोड यांच्या चौकशीचीही मागणी होतं आहे. याच प्रकरणी लष्करी न्यायालयात काही जणांनी धाव घेत अर्ज केले होते.

पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यूनंतर राजकारण ढवळून निघाले होते. या प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वकील व्ही. एन. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली जस्टीस लीग सोसायटीने लष्कर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पूजाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे व घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी जस्टीस लीग सोसायटीने केली होती. सोसायटीशी सलग्न असलेल्या वकील भक्ती पांढरे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

तर दुसरीकडे भाजपाच्या कायदा सेलनेही वकील एशानी जोशी आणि शुभांगी परुळेकर यांच्या माध्यमातून अर्ज दाखल केला होता. कलम १५६(३) अतंर्गत न्यायालयात दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. न्यायाधीश रोहिणी पाटील यांच्या पीठाने दोन्ही अर्ज फेटाळून लावले, अशी माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.

काय घडलं होतं पुण्यात?

मूळची बीड जिल्ह्यातील परळीच्या असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात टोकाचं पाऊल उचललं होतं. पूजाने पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील हेवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. ७ फेब्रवारी रोजी ही घटना घडली होती. पूजासोबत राहणाऱ्या दोन जण तिला रुग्णालयात घेऊन गेले होते. दरम्यान, या प्रकरणावरून राज्यात प्रचंड गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. भाजपाने थेट संजय राठोड यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला.