करोनाच्या विषाणूनं अवघा महाराष्ट्र वेठीस धरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. वेगानं रुग्णवाढ होत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बध लागू केले. त्याचबरोबर प्रवास करण्यासाठी काही नियमही ठरवून दिलेले आहेत. विशेषतः शेजारील राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्यांना करोना निगेटिव्ह चाचणी बंधनकारक केलेली आहे. मात्र, याचा फायदा घेत पुण्यात बनावट निगेटिव्ह रॅकेट कार्यरत झालं होतं. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना करोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २८ करोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन जण फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी पत्ताराम केसारामजी देवासी आणि राकेशकुमार बस्तीराम वैष्णव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांचे इतर दोन साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातून राजस्थानला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना करोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दिला गेला असल्याची माहिती पोलीस अधिकारी काटे यांना मिळाली. निगेटिव्ह रिपोर्ट हवा असल्यास ५००-६०० रुपये मोजावे लागत असल्याचे तपासातून पुढे आलं. दरम्यान, दोन्ही आरोपी हे ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशी बसवून देण्याचं काम करत. तेव्हा तिथे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना करोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट लागत असल्याने आरोपी केवळ ५००- ६०० रुपयांमध्ये रिपोर्ट देत असत. त्यांच्याकडे आढळलेले रिपोर्ट हे बावधन येथील लाईफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड येथील असून, त्यांच्या निगेटिव्ह रिपोर्टवरूनच आरोपी इतर डॉक्टरांच्या बनावट सह्या करून रिपोर्ट बनवत असत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. करोनाचे बनावट निगेटिव्ह २८ रिपोर्ट पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके हे करत आहेत.