अलिकडे भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिक खेळल्या गेलेल्या पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम आणि साई नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जणांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे. स्टेडियमच्या पाठीमागे डोंगराळ भाग असून निर्मनुष्य परिसर आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं काही जनांनी म्हटलं आहे. दरम्यान, परिसरात फिरणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन पोलीस पाटील हिरामण आगळे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या माध्यमांतून नागरिकांना केलं आहे.

गहुंजे क्रिकेट स्टेडियम आणि साई नगर परिसरात बिबट्या असल्याची चर्चा वाऱ्यासारखी शहरभर पसरली आहे. अनेकांनी परिसरात बिबट्या असल्याचं व्हॉटसऍप स्टेट्स ठेवलं आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या दृष्टिकोणातून लोक माहिती देत आहेत. प्रत्यक्षात मात्र बिबट्या आहे की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही. काही जणांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर परिसरात बिबट्या असल्याचा दावा केला आहे.

शनिवारी गहुंजे गावात बिबट्याचीच चर्चा होती. यावर पोलीस पाटील म्हणाले की, “बिबट्या डोंगराळ परिसरात गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. बिबट्या नाही म्हटला आणि अचानक कोणावर हल्ला केला तर? म्हणून अनेकांनी बिबट्या आल्याचे व्हाट्सएप स्टेटस ठेवले असून, नागरिक सतर्क राहावे, हा या मागचा हेतू आहे,” असं पोलीस पाटील आगळे यांनी म्हटलं आहे. तर, मोटारीतून बिबट्याचा व्हिडिओ घेण्यात आला असून तो देखील व्हायरल होत आहे.