News Flash

Video : कोविड सेंटरमधूनच सुरू होता ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार; रॅकेटचा पदार्फाश

पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई

पिंपरी चिंचवड पोलिसांबरोबरच ठाणे पोलिसांनीही कारवाई करत रेमडेसिवीरची विक्री करणाऱ्यांना अटक केली.

राज्यात करोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईकांचे बेहाल होत असताना दुसरीकडे कोविड सेंटरमधूनच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हे उघडकीस आलं आहे. कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारीच रेमडेसिवीर पुरवत असल्याचं तपासासून निष्पन्न झालं असून, कुंपनच शेत खातं असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनसह तब्बल १ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रेमडेसिवीर औषधाची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना खबऱ्याकडून मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलीस आयुक्तांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रकाश अमृतकर व सामाजिक सुरक्षा विभागाला कारवाई करण्याबाबत सूचना केल्या. अन्न व औषध प्रशासन अधिकारी भाग्यश्री यादव आणि विवेक खेडकर यांनी काळ्या बाजारात रेमडेसिवीरची विक्री करणाऱ्या आदित्य दिगंबर मैदर्गी याला बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संपर्क केला. त्याने दोन रेमडेसिवीरचे दोन इंजेक्शन असल्याची माहिती दिली. एक इंजेक्शन ११ हजार रुपयांना असून, दोन इंजेक्शनसाठी २२ हजार रुपये लागतील असं सांगितलं आणि पुण्यातील सांगवी भागात असलेल्या काटेपुरम चौकातील बॅडमिंटन हॉलसमोर बोलावलं.

माहिती सत्य असल्याचं कळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. तिथे बनावट ग्राहक बनून जात आदित्य मैदर्गी याला रेमडेसिवीर विकताना ताब्यात घेतले. त्याच्याकडील दोन्ही रेमडेसिवीर इंजेक्शनही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर प्रताप जाधवर (वय २४, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याच्याकडून इंजेक्शन घेतल्याचे त्याने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी प्रताप जाधवर याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून १ रेमडेसिवीर इंजेक्शन ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी त्याचीह चौकशी केली, तेव्हा रेमडेसिवीर इंजेक्शन अजय गुरदेव मोराळे याच्याकडून घेतल्याची माहिती दिली.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे अजय मोराळे (औंधमधील मेडीपॉईंट हॉस्पिटलमध्ये ब्रदर) याला ताब्यात घेतले. त्याचीही पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा मुरलीधर सुभाष मारूटकर यांच्याकडून हे इंजेक्शन विकत घेतल्याचं त्याने सांगितलं. मुरलीधर मारूटकर हे बाणेर येथील कोविड सेंटरमध्ये ब्रदर म्हणून कार्यरत आहे. कोविड सेंटरमधील रेमडेसिवीर इंजेक्शनकडून मारुटकरकडून काळ्या बाजारात विक्री करण्यात आल्याचं समोर आलं. त्यांनी आतापर्यंत किती इंजेक्शनची विक्री केली हे अद्याप समोर आलेलं नाही. तिन्ही आरोपी संगनमत करून रेमडेसिवीरची ११ हजार, १५ हजार व त्यापेक्षा जास्त दराने विक्री करीत होते. पोलिसांनी या कारवाईत तीन रेमडेसिवीर इंजेक्शनसह तब्बल १ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातही कारवाई…

ठाणे गुन्हेशाखा पोलिसांनीही रेमडेसिवीरची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल २१ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 3:41 pm

Web Title: pune news pimpri chinchwad police busted racket recovered remdesivir injection bmh 90 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “हलगर्जीपणा करु नका; लोकांचे जीव वाचवण्यासाठी साखळी तोडणं गरजेचं”
2 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा लांबणीवर
3 राज्यात पावसासह गारपिटीचाही इशारा
Just Now!
X