परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या मात्र, लसीकरणामुळे देशातच अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना थेट लस देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतल्यानंतर पुणे महानगरपालिकेनंही या निर्णयाचं अनुकरणं केलं आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर लसीकरण कोणत्या पद्धतीने आणि आठवड्यातील कोणत्या दिवशी केलं जाईल याबद्दलची माहिती ट्विट करून दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. “परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण ‘ड्राईव्ह’! शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रात आपण हा विशेष ड्राईव्ह राबवणत असून, नोंदणी न करता थेट ‘वॉक इन’ पध्दतीने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे,” अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

पुणे : रुग्णांची लूट थांबवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! राजेश टोपेंनी केली घोषणा!

“या लसीकरणासाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले असून, सकाळी १० ते ५ या वेळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना लस उपलब्ध होईल. यासाठी लसीकरणावेळी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश निश्चित झाल्याचे पुरावे सादर करणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची संख्या वाढली, तर हा ड्राईव्ह संपूर्ण आठवडाभर राबवण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदम गर्दी करु नये. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवेश निश्चित होऊनही केवळ लसीकरणासाठी विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण होऊ नये, या उद्देशाने आपण हा निर्णय घेतला आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा घ्यावा आणि लसीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी,” असं आवाहनही महापौर मोहोळ यांनी केले आहे.

मुंबईत दिवस दिली जाणार लस

लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने नवीन सुधारित नियमावली जाहीर केली असून त्यानुसार परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता लस दिली जाणार आहे. पालिके च्या कस्तुरबा, राजावाडी, कूपर रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यांना वैध पुरावा दाखवून सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी लस घेता येणार आहे.