News Flash

पुणे : “पती माझा फोटो व्हॉट्सअ‍ॅप ‘डीपी’ला ठेवत नाही”; उच्चशिक्षित पत्नीच्या तक्रारीनं पोलिसही झाले हैराण

भरोसा सेलनं मिटवलं भांडणं, दोघे पुन्हा एकत्र

प्राधिनिधीक छायाचित्र

संसार म्हटलं की, भांड्याला भांड लागतच. हे आपण कधी ना कधी ऐकलंच असेल. त्यामुळे कधी कोणत्या गोष्टीवरून पती-पत्नीमध्ये खटके उडतील सांगता येत नाही. पण, आपल्या आयुष्याचा भाग बनलेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे एखाद्याच्या संसारात वादाची ठिणगी पडल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? पण, हो अशी एक घटना पुण्यात घडलीये. निमित्त ठरलं व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी! माझ्या सगळ्या मैत्रिणींचे पती त्यांचा डीपीला ठेवतात. पण, माझा पती ठेवत नाही, अशी तक्रार घेऊन एक उच्चशिक्षित महिला पोलिसांकडे गेली. दोघांमध्ये सातत्यानं वाद होत असल्यानं हे प्रकरण भरोसा सेलकडे आलं होतं. अखेर तोडगा निघाला आणि दोघेही आता पुन्हा आनंदाने नांदू लागले आहेत.

दोघांमध्ये काय घडलं?

सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी या प्रकरणाविषयी माहिती दिली. “आमच्या विभागात कौटुंबिक समस्याबाबत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचं काम केले जातं. असंच एक दिवस दुपारच्या सुमारास एक महिला आमच्या विभागात आली. तिने अर्ज केला की, ‘पती माझ्याकडे लक्ष देत नाही. मला वडील नाहीत. त्यामुळे आई व लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर आहे. परंतु माझी आई आणि बहीण माझ्या माहेरीच राहतात. आम्हा पती पत्नीमध्ये काही वाद नाहीत. पती आणि मी जमेल तसे एकमेकांना विचारून आईला मदत करतो. त्या दोघीही आम्हाला अडीअडचणीच्या वेळी मदत करतात. आमच्या दोघांमध्ये संवाद चांगला आहे. पती कडून कोणताही त्रास नाही. नवरा कोणताही त्रास देत नाही.’ त्या महिलेकडून सर्व हकिकत ऐकून घेतली. त्यावर तुम्हाला नेमका त्रास काय आहे आणि इथे का अर्ज केला. त्यावर ती म्हणाली, ‘माझा पती व्हॉट्सअ‍ॅपला माझा डीपी ठेवत नाही. म्हणून मी त्याच्यावर नाराज आहे.’ यावर त्या महिलेच्या पतीकडे याबाबत विचारणा केली. तो म्हणाला, ‘मी हिची सगळी काळजी घेतो. तिला जपतो. माझ्या मेहुणीच्या शिक्षणाचा खर्च उचलतो. सासूबाईंना आधार देतो. वयोमानानुसार काही दुखणी असेल, तर दवाखान्यात घेऊन जातो. तरी ही माझ्याशी तिचा डीपी मी माझ्या व्हॉट्सअ‍ॅपला का ठेवला नाही म्हणून सारखी चिडत असते. त्यावरून आमच्यात सतत भांडण होत राहतात. मी काय करावं हेच मला कळत नाही,” असं त्याने सांगितलं.

समुपदेशानाने दोघे आले एकत्र…

भरोसा सेल महिलेचं समुपदेशन केलं. “तुझा पती तुझी काळजी घेतो. काय हवं नको ते पाहतो. तुझ्या घरच्यांची काळजी घेतो. याचा अर्थ त्याच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग तुझा एक फोटो डीपी म्हणून ठेवण्याने काही विशेष फरक पडणार आहे, की तुमचं काही नुकसान होणार आहे का?” त्यावर ती नाही म्हणाली. प्रेम हे दाखविण्यासाठी नसतं तर ते आपल्या वागण्या बोलण्यातून व्यक्त करायचे असते. तरच ते खरं प्रेम असतं याची जाणीव तिला दिली. त्यानंतर ते दोघे आमच्या भरोसा विभागातून यापुढे एकमेकांच्या बद्दल कधीच अशा प्रकाराची भावना येणार नसल्याचे सांगत निघून गेले, अशी माहिती शानमे यांनी दिली.

“आमच्याकडे अनेक प्रकरण येत असतात. पण आम्ही वेळोवेळी समुपदेशन करून एकत्र आणतो. मात्र समाजातील प्रत्येकानं एकमेकांसोबत कोणत्याही प्रकाराचे वाद झाल्यास किंवा काही घटना घडल्यास संवाद राखला पाहिजे. त्यातून निश्चित मार्ग निघतो,” असा सल्लाही सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी दाम्पत्यांना दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 10:54 am

Web Title: pune news pune police bharosa cell couples fight on whatsapp dp bmh 90 svk 88
Next Stories
1 पुणे : फडणवीस यांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्याला अटक
2 महापालिका कामगिरी मूल्यमापनात पुणे पाचव्या क्रमांकावर
3 कंत्राटी महिला कामगाराच्या कष्टातून मुलगा डॉक्टर
Just Now!
X