आजघडीला सोशल माध्यमं मूलभूत गरजांसारखीच बनली आहे. हाती मोबाईल आल्याने सोशल प्रत्येकाचाच सोशल माध्यमांवरील वावर वाढला आहे. यात अल्पवयीन युवक-युवतींचं प्रमाणही मोठं आहे. पण, हीच सोशल माध्यमं अनेकदा गुन्हेगारी आणि महिला अत्याचारांच्या घटनांना कारणीभूत ठरताना दिसत आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. इन्स्टाग्राम ओळख झाल्यानंतर एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम या सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीसोबत सहज संवाद साधू शकतो. पण याच माध्यमाचा वाईट अनुभव देणारी घटना घडली आहे पुण्यातील कात्रज परिसरात. सुखसागर भागात राहणार्‍या एका युवकाने अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला आहे. अक्षय साबळे (रा. दत्तनगर, कात्रज) असं आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी अक्षय या दोघांची ओळख इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर झाली. त्यानंतर ते दोघे सतत एकमेकांना बोलत असायचे. संवादातून आरोपीने अल्पवयीन तरुणीचा विश्वास संपादन केला. मंगळवारी (१३ एप्रिल) दुपारी तरुणीच्या घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने घरात घुसला. तरुणी एकटीच असल्याचं पाहून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी पसार झाला. पीडित तरुणीची आई घरी आल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेतला असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले.

पुण्यात सातत्यानं अत्याचाराच्या घटना घडत असून, काही महिन्यांपूर्वी डेटिंग साईटवर झालेल्या ओळखीनंतर आरोपीनं एका तरुणीवर बलात्कार केला होता. तरुणीला घरी नेऊन आरोपीनं कृत्य केल्याच्या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर समलैगिंक संबंधातून एका संशोधक विद्यार्थ्यांचीही हत्या करण्यात आली होती.