पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथील भूमकर पुलावरून जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. तर पिंपरी-चिंचवडमधील भूमकर चौक येथील पुलावर खासगी बसने टेम्पोला पाठीमागून धडक दिली. आज (११ जानेवारी) पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.

कात्रज बोगद्यातून आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दारूची वाहतूक करणारा ट्रक (एमएच १२ पीक्यू ८७३६) मुंबईच्या दिशेनं जात होता. हा ट्रक भूमकर पूलावर येताच मागून येणार्‍या ट्रकने (एमच१८ एए६६८१) जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, मागील ट्रकचा चेंदामेंदा झाला. अपघातात ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर दोघांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

भरधाव खासगी बस टेम्पोवर धडकली

पिंपरी-चिंचवडमधील किवळे हद्दीत, मुंबई बेंगलोर महामार्गावर आज पहाटे चारच्या सुमारास भरधाव खासगी बसने टेम्पोला पाठीमागून धडक दिली. यात, बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ५० प्रवाशी होते अशी माहिती रावेत पोलिसांनी दिली आहे. बजरंग गायकवाड (रा. लातूर) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती उदगीरहून मुंबईला खासगी बस जात होती. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि समोरील टेम्पोवर जाऊन आदळली. जखमींना औंध जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.