बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, त्यांना अभ्यासासाठी हक्काची जागा मिळावी यासाठी पूर्वी स्वयंसेवी संस्थांकडून अभ्यासिका सुरू करण्यात आल्या. मात्र, आता खासगी अभ्यासिकांची मोठी बाजारपेठच पुण्यात उभी राहिली असून, या व्यवसायाने आता चांगलाच जम बसवला आहे.
राज्यात बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुण्यात सर्वाधिक आहे. पुण्यात वसतिगृहांमध्ये किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहणारे विद्यार्थी आल्यावर पहिला शोध घेतात, तो अभ्यासिकेचा. विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेऊन अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, संघटना, महाविद्यालये यांनी पुण्यात अभ्यासिका उभ्या केल्या. मात्र, आता ‘अभ्यासिका’ सुरू करणे हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेला जुना फ्लॅट, वाडय़ातील जागा अशा ठिकाणी या अभ्यासिका सुरू केल्या जात आहेत. पुण्यात अक्षरश: गल्लोगल्ली अशा खासगी अभ्यासिका उभ्या राहिल्या आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पेठा, कर्वेनगर, कोथरूड, सातारा रस्ता, पर्वती, स्वारगेट, फग्र्युसन रस्ता या भागांमध्ये प्रत्येक गल्ली-बोळामध्ये सरासरी चार तरी अभ्यासिका सापडतील.
क्लासला पूरक अशा या अभ्यासिकांच्या व्यवसायाने पुण्यात मुळे रोवली आहेत. वर्षभराचे सदस्यत्व, परीक्षेच्या काळापुरते सदस्यत्व असे पर्याय अभ्यासिकांमध्ये उपलब्ध आहेत. दिवसाला ८ ते १२ तास बसता येईल अशा अभ्यासिकाही पुण्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू असतात. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अभ्यासिकेला पसंती देत आहेत. अनेक अभ्यासिका या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे केंद्र म्हणूनच ओळखल्या जातात. रोजची वर्तमानपत्रे काही निवडक पुस्तके, अंक अभ्यासिका उपलब्ध करून देतात. अनेक ठिकाणी डबेवालेही अभ्यासिकांशी जोडलेले आहेत. डब्यासाठीचे स्वतंत्र शुल्क आकारून दोन्ही वेळच्या डब्यांची सुविधाही काही अभ्यासिका उपलब्ध करून देतात.
अभ्यासिकांची उलाढाल
खासगी अभ्यासिकेचे एका महिन्याचे शुल्क हे किमान ३ हजार रुपयांपासून ते अगदी ८ हजार रुपयांपर्यंत आहे. छोटय़ा अभ्यासिकांमध्ये साधारण २५ ते ३० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. अगदी छोटय़ातल्या छोटय़ा अभ्यासिकेची वर्षांची उलाढाल ही साधारण १० लाख रुपयांच्या घरात जाते. वर्षांला करोडोंची उलाढाल करणाऱ्या अभ्यासिकाही पुण्यात आहेत आणि मोफत अभ्यासिकाही आहेत. मात्र, सध्या मोफत अभ्यासिकांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी आहे. जेव्हा हवे तेव्हा आणि हवा तेवढा वेळ अभ्यासिकेमध्ये घालवता यावा, यासाठी शुल्क भरून अभ्यासिकेमध्ये जाण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.
नियमन नाही
अभ्यासिकांच्या या व्यवसायावर कुणाचेही नियमन नाही. जेवढे विद्यार्थी अभ्यासिकेमध्ये बसू शकतात, त्यापेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना सदस्यत्व दिले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी एखाद्या छोटय़ा फ्लॅटमध्ये सुरू झालेल्या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांची दाटीवाटी दिसून येते. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात स्वच्छतागृहांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, अशा अनेक तक्रारी विद्यार्थी करत आहेत.
पॅरॅसाईट म्हणून राहणाऱ्यांना अभ्यासिकांचा आधार
विद्यापीठाचे वसतिगृह, महाविद्यालयांची वसतिगृहे या ठिकाणी मित्रांच्या खोलीवर परवानगी नसताना रहाणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकांचा आधार वाटत आहे. राहण्यासाठी जागा उपलब्ध नाही, म्हणून ‘चोरी छुपे’ राहणारे हे विद्यार्थी दिवसातला बहुतेक वेळ हा अभ्यासिकांमध्ये काढताना आढळतात. सकाळी वसतिगृहाला जाग येण्यापूर्वी बाहेर पडायचे आणि अभ्यासिका गाठायची. दिवस अभ्यासिकेमध्ये घालवायचा आणि रात्र झोपायला मित्राची वसतिगृहातील खोली गाठायची असा दिनक्रम पाळणारे अनेक पॅरासाईट विद्यार्थी अभ्यासिकांमध्ये दिसतात.
अभ्यासिका आणि गाववाले
पुण्यात राहायला आल्यानंतर अभ्यासिका हे जवळपास दुसरे घर झालेल्या या मंडळीचे अभ्यासिकांचे कट्टेही आहेत. एकत्र जमून अभ्यासिकेत मित्रांचे वाढदिवस, सगळे सण ही मंडळी उत्साहाने साजरे करतात. साधारणपणे एका गावातल्या, एका भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप्स या अभ्यासिकांमध्ये दिसून येतात.