पोलिसांनी वेळीच मदत केली नसती, तर डॉक्टरांच्या नजरेसमोर २० जणांचे तडफडून प्राण गेले असते. हो, अंगावर शहारा आणणारी ही घटना पुण्यात घडली आहे. राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढली असून ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. दरम्यान, नाशिक येथे मागील आठवड्यात ऑक्सिजन दुर्घटनेत निष्पाप २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यात अशाच पुनरावृत्ती होताना थोडक्यात टळली.

पुण्यातील कोथरूड पोलिसांना एक फोन आला. ‘आमच्या रुग्णालयात तासाभराचाच ऑक्सिजन साठा असून, २० रुग्ण आहेत. काही तरी मदत करा,’ अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी क्षणांचा विलंब न करता, सोशल मीडियाच्या मदतीने आणि योग्य नियोजन करून ऑक्सिजन सिलेंडर, ड्युरा कंटेनर रुग्णालयाला उपलब्ध करून दिला. पोलिसांनी वेळीच धावाधाव करत मदत केल्यानं २० रुग्णांचे जीव वाचले. यामुळे शहरात पोलिसांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले जात आहे.

pune oxygen shortage
ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवणारे कर्मचारी.

या घटनेबद्दल कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामकुमार डांगे यांनी माहिती दिली. ‘साहेब, आमच्या हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांना पुढील तासभर पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. आपण प्लीज काहीतरी मदत करा,’ असा फोन मला कृष्णा हॉस्पिटलमधून आला. त्या फोननंतर क्षणांचाही विलंब न करता ‘काही मिनिटं थांबा आपण काही करून तिथेच ऑक्सिजन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुयात,’ असं त्यावर मी डॉक्टरांना सांगितलं. आपल्या परिसरात कोणत्याही व्यक्तीला काही रुग्णालयाच्या बाबतीत समस्या निर्माण झाल्यास त्यांच्या मदतीकरिता कोथरूड परिसरातील सर्व रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच एक what’s app ग्रुप केला होता. त्यातील काही रुग्णालय व्यवस्थापनासोबत लगेच चर्चा केली. त्या चर्चेतून त्यांनी आसपासच्या काही रुग्णालयातून चार सिलेंडर मिळवले.

pune oxygen shortage

त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये पुन्हा फोन केला. ‘आता यावर पूर्ण काम होईल ना?,’ अशी विचारणा केली. ‘सर आम्हाला साधारण यावर ४ ते ५ तास काम चालेल,’ असं तेथील डॉक्टरांनी सांगितलं. ‘आमचा ड्युरा कंटेनर आहे. तो आम्हाला शिवाजीनगर येथील एका प्लॅन्ट मधून भरून दिल्यास दिवसभराचे काम होईल. तोवर आमच्याकडे आणखी ऑक्सिजन उपलब्ध होईल,’ रुग्णालयाने सांगितलं. त्यानंतर डांगे काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. इस्कॉट करून, पुढील तासाभरात रूग्णालयात ड्युरा कंटेनर उपलब्ध करून देण्यात आला. सोशल मीडियाचा योग्य वापर आणि चांगल्या प्रकारे नियोजन केल्यानं २० रुग्णांचे जीव पोलिसांनी वाचविल्याने कामगिरीचं विशेष कौतुक केलं जात आहे.